Anushka Sarkate & Nikhil Chavan Haldi Ceremony : ‘कारभारी लयभारी’ या मालिकेमुळे अनुष्का सरकटे व निखिल चव्हाण या दोघांची जोडी घराघरांत लोकप्रिय झाली. ही ऑनस्क्रीन जोडी आता खऱ्या आयुष्यात एकत्र येणार आहे. अनुष्का-निखिलचा विवाहसोहळा बुधवारी २४ जूनला थाटामाटात पार पडणार आहे. निखिल आता छत्रपती संभाजीनगरचा जावई होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून निखिल-अनुष्काच्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू होती. अखेर आता हे दोघंही साता जन्माचे जोडीदार होणार आहेत.
अनुष्का-निखिलचा साखरपुडा नुकताच पार पडला. मेहंदी अन् साखरपुडा झाल्यावर त्यांच्या हळदी समारंभासाठी सुद्धा जोरदार तयार करण्यात आली होती. राजकीय वर्तुळातील मान्यवर तसेच मराठी मनोरंजनविश्वातील अनेक लोकप्रिय कलाकार या दोघांच्या हळदी समारंभाला उपस्थित होते.
हळदी समारंभात या जोडप्याने सुंदर लूक केला होता. अनुष्काने लिंबू कलरची डिझायनर साडी नेसून, त्यावर मोत्यांचा डिझायनर ब्लाऊज परिधान केला होता. तर, निखिलने हळदीला ऑफ व्हाइट रंगाचा सदरा घातल्याचं फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. हळदीला जबरदस्त डान्स करत या दोघांनी मंडपात एन्ट्री घेतली. यानंतर या दोघांनी ‘कोंबडी पळाली’ गाण्यावर डान्स केला. यावेळी भरत जाधवांनी सुद्धा त्यांच्याबरोबर ठेका धरल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, मयुरेश पेम, मनमीत पेम, इंद्रनील कामत, शिवानी बावकर हे कलाकार अनुष्का-निखिलच्या हळदीला उपस्थित होते.
आता अनुष्का-निखिलच्या लग्नाला कोणकोणते कलाकार उपस्थित राहणार याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे. ‘लागिरं झालं जी’ मालिकेतील बहुतांश कलाकार या दोघांच्या लग्नसोहळ्यासाठी छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले आहेत.
दरम्यान, ‘लागिरं झालं जी’ मालिकेनंतर निखिल चव्हाण ‘झी मराठी’च्या ‘कारभारी लयभारी’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकला. यामध्ये त्याच्यासह अभिनेत्री अनुष्का सरकटेने मुख्य भूमिका साकारली होती. जवळपास दीड वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. यादरम्यान अनुष्का-निखिलची जोडी सर्वांच्या पसंतीस उतरली होती. आता ही रील लाइफ जोडी खऱ्या आयुष्यात सुद्धा एकत्र येणार आहे.
