अभिनेत्री अनुष्का सरकटे आणि अभिनेता निखिल चव्हाण यांची सध्या लगीनघाई सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून त्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. मराठी इंडस्ट्रीतील अनेक लोकप्रिय कलाकारांनी त्यांच्या या शुभ कार्याला हजेरी लावली आहे.
अनुष्का व निखिल सध्या त्यांच्या लग्नामुळे अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत, पण अनेकांना या दोघांची प्रेमकहाणी कधी आणि कशी सुरू झाले, दोघे कधी भेटले आणि यांच्या रिलेशनशिपला किती वर्षे झाली याबद्दल माहिती नाहीये. परंतु, अनुष्का व निखिल यांनी स्वत: संगीत सोहळ्यात याबद्दल सांगितलं आहे.
अनुष्कापेक्षा जास्त तिच्या वडिलांशी बोलतो निखिल
अनुष्का व निखिल यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यातील एका व्हिडीओमध्ये अनुष्काने ‘कारभारी लयभारी’ मालिकेपासूनच दोघांमध्ये संवाद सुरू झाले होते याबद्दल सांगितलं आहे. यावेळी तिने निखिल तिच्याशी जितकं बोलतो तितकंच तिच्या वडिलांशीही बोलतो आणि यामागचं कारण काय आहे हेही तिने यामधून सांगितलं आहे.
अनुष्का तिची प्रेमकहाणी सांगत म्हणाली, “आमच्या मैत्रिला पाच वर्षे झाली. जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा आम्ही एकमेकांशी बोलायला लागलो. निखिल माझ्याशी जेवढं बोलतो तेवढंच तो माझ्या बाबांशीही बोलतो. याचं कारण असं की मी चला हवा येऊ द्यामध्ये सांगितलं होतं की माझे वडील ज्या मुलावर हात ठेवतील त्याच्याशी मी लग्न करेन. म्हणून तो माझ्यापेक्षा जास्त पप्पांना फोन करतो.” निखिल पुढे म्हणाला, “एक गोष्ट सांगतो माझ्यावर फक्त वडिलांनी नाही तर पूर्ण सरकटे कुटुंबाने हात ठेवलाय.”
अनुष्का व निखिल यांचा साखरपुडा, हळद आणि संगीत सोहळा पार पडला असून या कार्यक्रमांतील त्यांच्या लूकने अनेकांचं लक्ष वेधलं. दोघांनी यावेळी विविध लूक केले होते. या जोडीच्या लग्न सोहळ्याला ‘लागीर झालं जी’ मालिकेतील टीमनेही हजेरी लावली आहे. निखिलने या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
दरम्यान, २०२०मध्ये अनुष्का व निखिल यांची ‘कारभारी लयभारी’ मालिका सुरु झाली होती आणि त्यामध्ये या दोघांनी मुख्य नायिका आणि मुख्य नायकाची भूमिका साकारली होती. जवळपास वर्षभर मनोरंजन केल्यानंतर या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला पण, यामुळे निखिल व अनुष्का यांची भेट झाली, त्यांच्यात मैत्री झाली आणि त्याचं रूपांतर प्रेमात झालं. आता ही जोडी लग्नबंधनात अडकत आहे.
