Nikhil Chavan & Anushka Sarkate Wedding : मराठी मनोरंजन विश्वात सध्या निखिल चव्हाण आणि अनुष्का सरकटे यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. नुकताच त्यांचा संगीत सोहळा पार पडला. या दोघांच्या लग्नासाठी मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक लोकप्रिय कलाकार छत्रपती संभाजीनगरला पोहोचले आहेत. मेहंदी, साखरपुडा, हळद, संगीत असे लग्नाआधीचे सगळे विधी पार पडल्यावर आज ( २४ जून ) अनुष्का-निखिल सप्तपदी घेऊन साता जन्माचे सोबती होणार आहेत.
अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाणच्या मैत्रीची सुरुवात ‘कारभारी लयभारी’ या मालिकेच्या निमित्ताने झाली. हळुहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन या जोडप्याने लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. पण, यादरम्यान अनुष्काने निखिलला आधीच सांगितलं होतं की, माझे वडील ज्या मुलावर हात ठेवणार त्याच्याशीच मी लग्न करणार! त्यांची हीच हटके लव्हस्टोरी अभिनेत्री उखाण्यातून सर्वांना सांगितली आहे.
अनुष्का सरकटेचा हटके उखाणा….
निखिलला मी म्हटलं,
माझे वडील ज्या मुलावर हात ठेवणार त्याच्याशीच मी लग्न करणार…
तो म्हणाला, मामला काही सिंपल दिसत नाही…
कारण, आता पोरीच्या आधी तिच्या वडिलांना पटवावं लागणार
मग त्याने घेतला धनुष्यबाण हाती…
म्हणाला…२२ जणांचं कुटुंब तुझं, जपून दाखवेन सगळी नाती!
त्याच्या मनातला खरेपणा सर्वांना दिसला
मी म्हटलं याचा बाण तर करेक्ट बसला!
मैत्रीतून प्रेम…प्रेमातून लग्न
उद्या घेऊन येतोय वरात दारी…
आता जन्मभर मी म्हणणार…
आमचे कारभारी जगात लयभारी!
निखिल आणि त्याच्या सासऱ्यांमध्ये खूपच छान बॉण्डिंग असल्याचं सुद्धा अनुष्काने यावेळी सांगितलं. अभिनेत्रीचं कुटुंब खूप मोठं असून तिच्या कुटुंबात एकूण २२ जण आहेत. या सगळ्यांची मनं जिंकून घेत आता निखिल सरकटेंचा जावई झाला आहे. ही रील जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र येणार असल्याने चाहतेही आनंदी आहेत.
दरम्यान, अनुष्का आणि निखिलच्या लग्नाला राजकीय वर्तुळातील मान्यवरांसह अनेक मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकार सुद्धा उपस्थित राहणार आहेत. भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, शिवानी बावकर, श्वेता शिंदे, किरण गायकवाड, इंद्रनील कामत, मयुरेश पेम, वैष्णवी कल्याणकर असे सगळेच कलाकार या दोघांच्या लग्नसोहळ्यासाठी छत्रपती संभाजीनगरला पोहोचले आहेत.
