Anushkka Sarkate & Nikkhhil Chavaan Engagement : मराठी मालिकाविश्वातील अनेक ऑनस्क्रीन कपल अलीकडे लग्नबंधनात अडकले. अशातच आता टेलिव्हिजनवरील अजून एका लोकप्रिय जोडीने गुड न्यूज दिली आहे. ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का सरकटे व अभिनेता निखिल चव्हाण यांचं लग्न ठरल्याची बातमी समोर आली आहे.
‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘कारभारी लयभारी’मध्ये अनुष्का व निखिल यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. मालिकेतील दोघांच्या जोडीला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. अशातच आता खऱ्या आयुष्यातसुद्धा ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच अनुष्का व निखिल यांचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला आहे.
अनुष्का-निखिल यांचं ठरलं
राजकीय नेते विनोद पाटील यांनी अनुष्का व निखिल यांचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. यावेळी त्यांनी या व्हिडीओला, “आमच्या भाची अनुष्का सरकटे आणि लोकप्रिय मराठी अभिनेता निखिल चव्हाण यांचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला आहे. ते दोघे ‘करभारी लयभारी’ या झी मराठीवरील मालिकेत झळकले होते.” अशी कॅप्शन दिली आहे.
यामधून ते पुढे म्हणाले, “हा खास क्षण साजरा करण्यासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र जमलं आणि हा आनंदाचा सोहळा अधिक सुंदर बनवला. या गोड जोडप्याला पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. प्रेम, आनंद आणि सुखी प्रवास लाभो”.
समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमासाठी अनुष्काने लाल रंगाची साडी नेसली असून त्यावर लाल रंगाच्या बांगड्या आणि गळ्यात डिझायनर डायमंडचा नेकलेस परिधान केला आहे. परंतु, निखिलने निळ्या रंगाचं शर्ट आणि काळी पँट परिधान केली आहे. दोघेही या व्हिडीओमध्ये कुटुंबीयांबरोबर संवाद साधनाता आणि हा आनंदाचा क्षण एन्जॉय करताना दिसत आहेत.
अनुष्का व निखिल यांनी अद्याप या कार्यक्रमाचे कोणतेही फोटो व व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केलेले नाहीयेत. अनुष्काचे मामा विनोद पाटील यांनी तिच्या व निखिलच्या सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमातील हा व्हिडीओ शेअर केल्यानतंर हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
दरम्यान, अनुष्का सध्या ‘स्टार प्रवाह’वरील ‘वचन दिले तू मला’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. तिच्या या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर निखिलनेही आतापर्यंत मालिका, चित्रपटांत काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आता ही ऑनस्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यातसुद्धा एकमेकांचे जोडीदार बनले आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी हा सुखद धक्का आहे.
