कधी कधी एखादी कलाकृती कलाकारांसाठी इतकी महत्त्वाची ठरते की तिच त्यांची ओळख बनते. असंच काहीसं झालेलं हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत दया हे महत्त्वपूर्ण पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीबरोबर. पण अनेकांना माहीत नसेल की तिला ही मालिका स्वीकारण्यासाठी लोकप्रिय अभिनेत्री अपरा मेहता यांनी सल्ला दिला होता.
दिशा वकानीने तिच्या अभिनयाने इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील दयाबेनच्या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली आणि लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली. मातृत्वामुळे तिने मालिकेतून ब्रेक घेतला असला, तरी दयाबेनच्या भूमिकेत दिशा वकानीने पुन्हा परतावं, अशी चाहत्यांची आजही इच्छा आहे. अशातच आता ज्येष्ठ अभिनेत्री अपरा मेहता यांनी टेली मसालाला दिलेल्या मुलाखतीत दिशाच्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील सहभागाबद्दल भाष्य केलं आहे.
दिशा वकानीला दिलेला महत्त्वाचा सल्ला
अपरा मेहता यांनी सांगितलं की, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सुरू झाला तेव्हाच या मालिकेचा प्रवास किमान आठ वर्षांहून अधिक काळ सुरू राहील, असा त्यांचा अंदाज होता. दिशा वकानीला त्यांनी एक खास सल्लाही दिला होता. अपरा म्हणाल्या की, दिशाने अनेक प्रोजेक्ट्स करण्यापेक्षा ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतच काम सुरू ठेवावं, असा सल्ला त्यांनी तिला दिला होता.
अपरा मेहता यांनी सांगितलं, “माझी दिशा वकानीबरोबर मोहन स्टुडिओमध्ये भेट झाली होती. त्यावेळी मी तिला ही भूमिका स्वीकारण्यास सांगितलं होतं आणि ही मालिका अनेक वर्षे यशस्वीपणे सुरू राहील, असंही सांगितलं होतं. मला मान्य करावं लागेल की, मी दिशाची खूप मोठी चाहती आहे. मी आजवर इतर कोणत्याही कलाकाराबद्दल असं म्हटलं नाही; पण ती खरंच खूप उत्तम अभिनेत्री आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे तिने आता या मालिकेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे आणि माझ्या मते ती एक खूप चांगली व्यक्ती आहे. कोणत्याही एका कलाकारापेक्षा शो नेहमीच मोठा असतो आणि तो पुढे सुरू राहतो. मला वाटतं की, तिने घेतलेला हा निर्णय खूप महत्त्वाचा होता”.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेने नुकतीच १८ वर्षे पूर्ण केली आहेत. या निमित्ताने मालिकेच्या निर्मात्यांनी सेटमध्येही मोठा बदल केला असून, नव्या भागांसाठी नव्या स्वरूपातील गोकुळधाम सोसायटी साकारण्यात आली आहे.
