टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिका या प्रेक्षकांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग असतात. काही मालिका त्यांच्या वेगळ्या कथानकामुळे, कलाकारांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या लाडक्या बनलेल्या असतात. अशा मालिकांपैकी म्हणजे एक म्हणजे ‘अप्पी माझी कलेक्टर’ ही आहे. आता या मालिकेमध्ये नवे वळण येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
अप्पी आणि अर्जुन होणार वेगळे
झी मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर अप्पी आमची कलेक्टर मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अमोल त्याच्या आईला म्हणजेच अप्पीला विचारत आहे की, “बाबा कुठेय?”, त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना अप्पी म्हणते, “तो आपल्याला सोडून निघून गेला आहे.” अमोल तिला विचारतो, “पण का?” त्यावर अप्पी म्हणते, “कारण आपण त्याला त्याच्याबरोबर नको आहे.” त्यानंतर अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो, “अमोल बाळा मी तुला माझ्यासोबत घ्यायला आलोय.” अमोल म्हणतो, “पण मला तुमच्यासोबत एकत्र राहायचं आहे.” त्यानंतर अर्जुन आणि अप्पी तिथून निघून जातात.
त्यानंतर या प्रोमोमध्ये दवाखान्यातील दृश्य दाखवले असून, वॉर्डबॉय डॉक्टरला विचारतो, “अमोल कदमचे रिपोर्ट आलेत का? काय झालंय त्याला?” डॉक्टर म्हणतात, “त्याच्याकडे फक्त दोन महिने राहिलेत.” अमोल देवासमोर हात जोडून प्रार्थना करत असल्याचे दिसत आहे. तो म्हणतो, “मला काही झालं तरी चालेल पण माझ्या माँ आणि बाबांना एकत्र आण.”
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘अमोलची इच्छा होईल का पूर्ण…?’, अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, अर्जुन अप्पीला म्हणतो की आपण फक्त अमोलसाठी एकत्र राहायचं. इथून पुढे आपल्यात नवरा-बायकोचं नातं नसेल. ही गोष्ट अमोलला चुकूनही कळाली नाही पाहिजे. मात्र ही गोष्ट अमोल ऐकतो आणि तो बेशुद्ध पडतो. खोलीच्या बाहेर पडणाऱ्या अप्पीला अमोल बेशुद्ध पडलेला दिसतो. त्याला दवाखान्यात दाखल केले जाते. त्यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावर काळजी असल्याचे पाहायला मिळाले.
आता मालिकेत नेमके पुढे काय होणार, अमोलला नक्की काय झाले आहे, अप्पी आणि अर्जुनचे नात्यामध्ये काय बदल होणार, मालिकेत कोणते नवे वळण येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.