Shivani Naik shares emotional post: ” ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका प्रेक्षकांची लाडकी मालिका होती. ऑगस्ट २०२२ मध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मार्च २०२५ मध्ये मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. दोन वर्षांहून अधिक काळ या मालिकेने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले.
मालिकेत अप्पी, अर्जून, अमोल आणि अशी अनेक पात्रे पाहायला मिळाली. अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतून कलाकारांनाही मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली.
“अप्पीच्या प्रवासात शिवानी घडली”
अप्पी आमची कलेक्टर मालिकेत अभिनेत्री शिवानी नाईकने प्रमुख भूमिकेत काम केले होते. आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. २२ ऑगस्ट २०२२ ला मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता, यानिमित्ताने शिवानीने काही फोटो शेअर करत लिहिले, “२२ ऑगस्ट २०२२ म्हणजे याच दिवशी ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेचा पहिला भागच नाही तर माझा चेहरासुद्धा पहिल्यांदा टीव्हीवर दिसला आणि माझ्या आयुष्यातला अभिनेत्री म्हणून पहिला मोठा प्रवास सुरू झाला. या प्रवासाने ऊन, वारा, पाऊस सगळ पाहिलं; अप्पीच्या प्रवासात शिवानी घडली.”
पुढे तिने असेही लिहिले, “या मालिकेने, अप्पीने खूप दिलंय. आज महाराष्ट्रभर फिरत असताना अप्पी म्हणून जो मान मिळतो, जे प्रेम मिळतं ते पाहून खरंच मन भरून येतं. मालिकेसाठी, अप्पी या भूमिकेसाठी मी कायम कृतज्ञ राहीन. प्रवास आता कुठे सुरू झालाय, अजून खूप पल्ले गाठायचे आहेत, माझ्या रसिकप्रेक्षकांचं मनोरंजन करायला मी सदैव तत्पर आहे. माझ्या पदरी ही एवढी सुंदर भूमिका टाकल्याबद्दल मी मनापासून आभारी आहे.” असे म्हणत शिवानीने श्वेता शिंदे, वज्र प्रोडक्शन आणि झी मराठी वाहिनीच्या इन्स्टाग्राम अकाउंटला टॅग केले.
याबरोबरच तिने मालिकेतील तिच्या लूकचे काही फोटो शेअर केले आहेत. तसेच तिला पुरस्कार मिळाल्याचे फोटोही शेअर केले आहेत.
शिवानी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती विविध फोटो, व्हिडीओ शेअर करते. तसेच, अप्पी आमची कलेक्टर मालिकेतील सहकलाकारांबरोबर, तिच्या ऑनस्क्रीन मुलाबरोबर म्हणजे बालकलाकार साईराज केंद्रेबरोबर तिचे उत्तम नाते, बॉण्डिंग असल्याचे पाहायला मिळते.
दरम्यान, शिवानी आगामी काळात कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
