Marathi Actors Apurva Gore and Anshuman Joshi : यंदाच्या वर्षी अनेक मराठी कलाकार लग्नबंधनात अडकल्याचं पाहायला मिळालं. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली ईशा म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा गोरेचा विवाहसोहळा सुद्धा काही दिवसांपूर्वीच थाटामाटात पार पडला. अपूर्वाने ‘शाळा’ चित्रपटात मुकुंदची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अंशुमन जोशीबरोबर नुकतीच लग्नगाठ बांधली. खरंतर, सुरुवातीला अपूर्वाला अभिनय क्षेत्रातील मुलाशी लग्न करायचं नव्हतं. पण, नंतर अंशुमनला भेटल्यावर हळुहळू तिचे विचार बदलले. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यानंतर अपूर्वा व अंशुमनने कुटुंबीयांच्या संमतीने लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.

अपूर्वा-अंशुमनचा लग्नसोहळा ८ मार्चला थाटामाटात पार पडला. आता या जोडप्याने एकमेकांसाठी खास पोस्ट लिहिल्या आहेत. अपूर्वा गोरेचा वाढदिवस २५ मार्चला असतो आणि अंशुमनचा वाढदिवस २६ मार्चला असतो. म्हणजेच या दोघांचे बर्थडे लागोपाठ असतात. आता या दोघांनी एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा दिल्यात? पोस्टमध्ये काय लिहिलंय? जाणून घेऊयात…

अपूर्वा गोरेचा वाढदिवस, २५ मार्चला असतो. म्हणजेच कालच अंशुमनने आपल्या बायकोसाठी खास पोस्ट शेअर केली होती. अभिनेता लिहितो, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मिसेस… युद्ध थांबलं बघ! आता गोष्टी व्हाव्यात स्वस्त…अपूर्वा, तू आलीस म्हणून आयुष्य चाललंय मस्त!”

Award Banner

याशिवाय नवऱ्याला वाढदिवसाच्या ( २६ मार्च ) शुभेच्छा देताना अपूर्वा लिहिते, “माय दिल, जिगर, जान, लिव्हर आहेस तू… वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा…आय लव्ह यू! तुझ्याबरोबरचा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण सुखात आणि आनंदात जातो. थँक्यू तू आहेस म्हणून सगळं आहे.”

अपूर्वाने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. सर्वांनी या गोड जोडप्याला आता आयुष्याच्या पुढील प्रवासासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

याशिवाय अपूर्वाच्या नवऱ्याबद्दल सांगायचं झालं, तर अंशुमनने २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शाळा’ या गाजलेल्या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारली होती. अंशुमन अभिनेता, दिग्दर्शक, लेखक, चित्रलेखक आणि छायाचित्रकार म्हणून ओळखला जातो.