२०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शाळा’ चित्रपटात मुकुंदची भूमिका अभिनेता अंशुमन जोशीने साकारली होती. काही दिवसांपूर्वीच अंशुमनने अभिनेत्री अपूर्वा गोरेशी लग्न केलं. ‘आई कुठे काय करते’ या सुपरहिट मालिकेमध्ये अपूर्वाने अरुंधतीच्या मुलीची म्हणजेच ईशाची भूमिका साकारली होती. आता अपूर्वा-अंशुमन एकमेकांना नेमके भेटले कुठे, त्यांची ओळख कशी झाली असे बरेच प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.
अपूर्वाला अभिनय क्षेत्रातील मुलाशी लग्न करायचं नव्हतं. पण, नंतर अंशुमनला भेटल्यावर हळुहळू तिचे विचार बदलले. नुकत्याच ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत अपूर्वा व अंशुमन या दोघांनी त्यांची लव्हस्टोरी सांगितली आहे.
अंशुमन जोशी म्हणाला, “आमचं ‘अरेंज लव्ह मॅरेज’ आहे. अपूर्वाचा वाढदिवस असतो २५ मार्चला आणि माझा २६ मार्चला…गेल्यावर्षी मला आईने वाढदिवसाच्या दिवशी फोन केला होता आणि सगळ्या गप्पा मारून झाल्यावर आई म्हणाली, आता आपण तुझं लग्न केलं पाहिजे. मी विचारलं का? मग आम्ही काही माणसांना भेटलो, ज्यांनी माझी जन्मपत्रिका पाहिली. बहुतेक लोकांनी मला सांगितलं, तिशीच्या आत माझं लग्न होईल…माझ्यापेक्षा वयाने मोठ्या मुलीशी लग्न होईल. ती आयुष्यात आल्यानंतर माझ्या आयुष्याचा कायापालट होईल वगैरे…पण, मला हे सगळं होईल असं तेव्हा वाटत नव्हतं. त्यानंतर घरच्यांनी मुली पाहायला सुरुवात केली, त्यांची शोधमोहीम सुरू झाली.”
“घरी सगळं लग्नाचं सुरू असताना नेमकं त्याचदरम्यान मी आणि अपूर्वा ऑनलाइन एकमेकांना भेटलो म्हणजे ऑनलाइन आमची एकमेकांशी ओळख झाली होती. त्यानंतर मग आमच्यात खूप चांगली मैत्री झाली. आपण लग्न वगैरे करुयात असं आमचं काहीच ठरलं नव्हतं. पण, हळुहळू गोष्टी जाणवू लागल्या…त्यानंतर आमच्या दोघांचे आई-बाबा एकमेकांना भेटले. त्याच दिवशी मग लग्नाच्या तारखा काढल्या आणि मग आमचं लग्न ठरलं.” असं अंशुमनने सांगितलं.
अपूर्वा म्हणाली, “मला या क्षेत्रातील मुलाशी लग्न करायचं नव्हतं. पण, जेव्हा आम्हा दोघांची ऑनलाइन ओळख झाली तेव्हा मी त्याला आपण एका इंडस्ट्रीत काम करतो या उद्देशाने भेटायला गेले होते. कुठेच लग्नाचा विचार वगैरे माझ्या मनात नव्हता. आम्ही पहिल्यांदा जेव्हा भेटलो तेव्हाच सहा तास गप्पा मारल्या होत्या. त्यानंतर हा मला घरी सोडायला आला…त्याने मला Bye केलं आणि तेव्हाच पाऊस पडू लागला. मला आता असं वाटतं तिच कुठेतरी पहिली साइन होती. घरी गेल्यावर आम्ही दोघं एकमेकांशी चॅटवर बोललो…त्यानंतर त्या संपूर्ण आठवड्यात आम्ही इतकं बोललो की, लोक पाच वर्षात एवढं बोलले नसतील. आमची एकमेकांशी खूप चांगली मैत्री झाली. काही महिने आम्ही छान मित्र होतो. आई-बाबा हो म्हणाले तरच आपण लग्न करायचं हे आमचं ठरलं होतं. त्यानंतर याने सांगितल्याप्रमाणे एके दिवशी आमचे आई-बाबा भेटले आणि मग लग्नाच्या तारखा काढल्या.”
दरम्यान, दोघांच्या घरच्यांनी या लग्नासाठी लगेच होकार दिला. गेल्यावर्षी अपूर्वा-अंशुमनची ओळख झाली होती आणि नंतर वर्षभरातच या दोघांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.
