Apurva Nemlekar First Mangalagaur : श्रावणात मंगळागौरीला विशेष महत्व आहे. नवविवाहित मुली आपल्या सुखी संसारासाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी श्रावण महिन्यातील मंगळवारी हे मंगळागौरीचं व्रत करतात असं मानलं जातं. लग्नानंतरची पहिली मंगळागौर मोठ्या थाटात साजरी केली जाते. महिला एकत्र येऊन झिम्मा-फुगड्यांचा खेळ खेळतात. जुनी गाणी गातात, टाळ्यांच्या तालावर आणि विशिष्ट गाण्यांवर गोलाकार फिरत झिम्मा खेळला जातो. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक लोकप्रिय अभिनेत्रींची सुद्धा यंदा पहिली मंगळागौर आहे. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने नुकतीच तिची पहिली मंगळागौर साजरी केली आहे. पण, अपूर्वाने तिची ही मंगळागौर मुंबई किंवा पुण्यात नव्हे तर थेट अमेरिकेत साजरी केली आहे.
लाल रंगाची सुंदर नऊवारी साडी, त्यावर पिवळी शाल, गळ्यात पारंपरिक दागिने, हिरव्या बांगड्यांचा चुडा, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर या मराठमोळ्या लूकमध्ये अपूर्वा नेमळेकर खूपच सुंदर दिसतेय. “POV : माझी अमेरिकेत पहिली मंगळागौर” असं कॅप्शन अभिनेत्रीने तिच्या व्हिडीओला दिलं आहे. याशिवाय पोस्टमध्ये तिने परदेशात मंगळागौर साजरा करण्याचा खास अनुभवही सांगितला आहे.
अपूर्वा लिहिते, “माझी पहिली मंगळागौर…आणि ती सुद्धा अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये…आपल्या सुंदर मराठी परंपरा परदेशात सुद्धा इतक्या प्रेमाने आणि उत्साहाने जपल्या जात असल्याचं पाहून खरंच खूप आनंद होतो आणि एक वेगळंच समाधान मिळतं. यानिमित्ताने महाराष्ट्रापासून हजारो मैल दूर असूनही घराच्या अगदी जवळ असल्यासारखं वाटलं. हा खरोखरंच माझ्यासाठी खूप स्पेशल अनुभव होता. सर्वांमध्ये एक जबरदस्त उत्साह होता…त्यामुळे हा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला. सर्वांना एकत्र आणल्याबद्दल आणि सातासमुद्रापार आपली संस्कृती व परंपरा जिवंत ठेवल्याबद्दल ‘मराठी आई इनिशिएटिव्ह’ (MAI) आणि डॉ. सायली नातू यांचे मनापासून आभार. परदेशातही आपली संस्कृती आणि ही सुंदर नाळ जपली जातेय, हे पाहून मन भरून आलं!”
अपूर्वा नेमळेकरच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अपूर्वा नेमळेकरने १४ फेब्रुवारी २०२६ रोजी लग्न केलं. अपूर्वाच्या नवऱ्याचं नाव आहे तनुज गोवळकर. तो सुद्धा बायकोच्या पहिल्या मंगळागौरीच्या कार्यक्रमाला उपस्थित होता.
दरम्यान, ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमुळे अपूर्वा घराघरांत लोकप्रिय झाली. तिने या मालिकेत साकारलेली ‘शेवंता’ ही भूमिका प्रत्येकाच्या पसंतीस उतरली होती. आजवर अपूर्वा ‘रात्रीस खेळ चाले’, ‘आभास हा’, ‘प्रेमाची गोष्ट’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये झळकली आहे.
