मालवणी किंवा कोकणी जेवण म्हटलं की भल्या भल्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. कोंबडी वडे, मासे, मच्छीचं सार असे विविध पदार्थ डोळ्यासमोर येतात. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार सुद्धा मूळचे कोकणातले आहेत. या कलाकारांच्या सोशल मीडिया पोस्टमधून आपल्याला कोकणातील पारंपरिक पदार्थ, कोकणातील निसर्ग सौंदर्य, येथील सणवार आणि अनेकदा कोंबडी वडे-फिश फ्राय अशा नॉनव्हेज पदार्थांची सुद्धा झलक पाहायला मिळते. अशातच एका लोकप्रिय अभिनेत्रीने शेअर केलेला अस्सल मालवणी जेवणाचा व्हिडीओ सर्वत्र चर्चेत आला आहे.
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने नुकताच तिच्या घरी अस्सल मालवणी जेवणाचा बेत केला होता. हा व्हिडीओ अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये अपूर्वा स्वत: मासे बनवत असल्याचं पाहायला मिळत आहे.
भरलेलं पापलेट, कोळंबी फ्राय, कोळंबी भात असा खास बेत तिने जेवणासाठी केला होता. “ही एकमेव किर्र-किर्र मी कायम ऐकू शकते ( फिश फ्राय करताना येणार आवाज )” असं अपूर्वा या व्हिडीओमध्ये चाहत्यांना सांगते. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
अपूर्वाच्या व्हिडीओवर “आयुष्य सुंदर आहे फक्त असे मासे मिळायला हवेत” अशी कमेंट एकाने केली आहे. यावर अभिनेत्री म्हणते, “यासाठी शूटिंग लवकर संपवून मालाड फिश मार्केट गाठलं. तिथून ठाण्याला ड्राइव्ह करून आले मग हे मासे बनवले…फक्त आईचा वाढदिवस होता म्हणून…पण, आज खऱ्या अर्थाने माहिमचं सिटीलाइट मार्केट मिस केलं…तिथे जे मासे मिळतात त्याला तोड नाय!”
“तोंडाला पाणी सुटलं”, “शेवंताची किर-किर पाहून मन सुखावलं”, “मस्त बनवलेत मासे”, “जमलंय ताई मस्त व्हिडीओ”, “भारी बनवलंय”, “अपूर्वा मॅम एक नंबर नादखुळा” अशा कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत.
दरम्यान, ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत अपूर्वाने साकारलेली शेवंता ही भूमिका सर्वत्र तुफान गाजली होती. यानंतर तिने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सावनी हे पात्र साकारलं. सध्या अभिनेत्री ‘शुभविवाह’ मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.
