Apurva Nemlekar Griha Pravesh Video : मराठी मालिकाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय कलाकार लग्नबंधनात अडकले. प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने देखील १४ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधत तिच्या तमाम चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. अपूर्वाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाले होते. अभिनेत्रीने ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या दिवशी आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात केली.

अपूर्वाच्या नवऱ्याचं नाव आहे तनुज गोवळकर. १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या दिवशी या दोघांचं लग्न थाटामाटात पार पडलं. त्याआधी २३ नोव्हेंबर २०२५ रोजी तनुजने समुद्रकिनारी अपूर्वाला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. याचा व्हिडीओ देखील या जोडप्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आता अपूर्वाने शेअर केलेल्या आणखी एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “आमच्या प्रेमाला एक नवा पत्ता सापडला” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने तिच्या गृहप्रवेशाचा व्हिडीओ सर्वांबरोबर शेअर केला आहे.

अपूर्वाच्या सासरी गृहप्रवेशासाठी खास तयारी केली होती. नव्या सुनेसाठी सुंदर रांगोळी, फुलांची सजावट करण्यात आली होती. याशिवाय अपूर्वाने सासरच्या घरात एन्ट्री घेताच तनुजच्या कुटुंबीयांनी तिच्यावर फुलांची उधळण केली. माप ओलांडून गृहप्रवेश करताना अभिनेत्रीने सुंदर असा उखाणा घेतला.

अपूर्वा उखाणा घेत म्हणते, “अंगणात आहे तुळस, तुळशीजवळ लावला दिवा…तनुज रावांचं नाव घेते जन्मोजन्मी असाच जोडीदार हवा..!”

अपूर्वा आणि तनुज लग्नानंतर जोडीने सत्यनारायणाच्या पूजेला बसल्याचं देखील या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांसह अभिनेत्रीच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमुळे अपूर्वा घराघरांत लोकप्रिय झाली. तिने या मालिकेत साकारलेली ‘शेवंता’ ही भूमिका प्रत्येकाच्या पसंतीस उतरली होती. आजवर अपूर्वा ‘रात्रीस खेळ चाले’, ‘आभास हा’, ‘प्रेमाची गोष्ट’ अशा एकापेक्षा एक लोकप्रिय मालिकांमध्ये झळकली आहे. आता ती लग्नानंतर कोणत्या नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.