Apurva Nemlekar Proposal Video : १४ फेब्रुवारी म्हणजेच प्रेमाचा दिवस. यंदा ‘व्हॅलेंटाईन्सच्या डे’च्या दिवशी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत अपूर्वाने तिच्या तमाम चाहत्यांना सुखद धक्का दिल्याचं पाहायला मिळालं. थाटामाटात लग्न पार पडल्यावर अपूर्वाचा नवरा तनुज गोवळकरने एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ नेमका काय आहे पाहुयात.

लग्नसोहळा पार पडल्यावर तनुजने इन्स्टाग्रामवर प्रपोजल व्हिडीओ शेअर केला आहे. अपूर्वा आणि तनुज काही महिन्यांपूर्वी समुद्रकिनारी फिरायला गेले होते. यावेळी व्हिडीओ शूट करत असताना तनुज समुद्रकिनारी अचानक गुडघ्यावर बसला आणि त्याने अपूर्वाला लग्नासाठी मागणी घातल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

तनुजने अशाप्रकारे लग्नाची मागणी घालणं हा अपूर्वासाठी सुद्धा सुखद धक्का होता. अपूर्वाने आनंदी होऊन लगेच आपला होकार दिला अन् त्यानंतर दोघांनीही व्हिडीओमध्ये आपल्या हातातील अंगठ्या सर्वांना दाखवत ‘Engage’ झाल्याची घोषणा केली.

अपूर्वाचा नवरा तनुज या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहितो, “अन् तिने होकार दिला…आम्ही वीकेंडला फिरायला गेलो होतो पण हा दिवस अचानक प्रपोजलमध्ये बदलला गेला…कदाचित हे प्रपोजल तुम्हाला स्क्रिप्टेड वाटेल पण, देवाने काही गोष्टी आधीच लिहून ठेवलेल्या असतात. या सूर्यास्तानंतर जग संपूर्णपणे थांबलं तरी चालेल कारण तिने मला ‘हो’ म्हटलंय. २३.११.२०२५”

२३ नोव्हेंबर २०२५ म्हणजेच लग्नाच्या अडीच महिने आधी तनुजने अपूर्वाला प्रपोज केलं होतं. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आता प्रेक्षकांची लाडकी अपूर्वा मिसेस तनुज गोवळकर झालेली आहे.

दरम्यान, अभिनेत्रीचं हे दुसरं लग्न आहे. अपूर्वाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, ‘रात्रीस खेळ चाले’, ‘आभास हा’, ‘प्रेमाची गोष्ट’ अशा एकापेक्षा एक लोकप्रिय मालिकांमध्ये ती झळकली आहे. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. नुकतीच अपूर्वा ‘शुभविवाह’ मालिकेत झळकली होती. आता ती लग्नानंतर कोणत्या नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.