Apurva Nemlekar Injured During Ganpati Decoration: सर्वत्र गणरायाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. घराघरांत मखर सजवले जात असून, गणेशोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात झाली आहे. मराठमोळी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिच्या घरीही गणपतीच्या आगमनाची तयारी सुरू असून, याचदरम्यान तिला दुखापत झाली आहे. सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे.
अपूर्वा नेमळेकरचा लग्नानंतरचा हा पहिलाच गणेशोत्सव आहे. त्यामुळे तिच्या घरी गणरायाच्या स्वागताची लगबग पाहायला मिळत आहे. अपूर्वा, तिचा पती तनुज गोवळकर आणि कुटुंबातील इतर सदस्य मिळून घरातच मखर तयार करीत आहेत. त्यासाठी त्यांनी पीव्हीसी पाईपचा वापर केला आहे. सजावट करताना अपूर्वा ग्लू-गनच्या (वस्तू चिकटवण्याची मशीन) मदतीने कापूस लावत होती. मात्र, त्याच वेळी गरम ग्लू तिच्या हातावर पडल्याने तिला चटका बसला.
अपूर्वा नेमळेकरला मखर बनवताना झाली जखम
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अपूर्वा लायटिंग व कापूस लावत असल्याचे दिसून येत आहे. ग्लू-गनचा वापर करून, ती सर्वत्र कापूस लावत होती. मात्र, यावेळी तिला नकळतपणे त्याचा चटका बसला आणि तिच्या हाताला जखम झाली. त्यानंतर जखमेला क्रीम लावल्याचे दिसून आले. भाजल्यानंतरही अपूर्वाचा उत्साह कमी झाला नसून, त्यानंतरही ती मखराच्या सजावटीत घरात मदत करीत असल्याचे दिसून आले आहे.

अपूर्वाच्या घरातील या मखराची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. घरच्या घरी मखर तयार केल्याबद्दल अनेकांनी तिचे कौतुक केले. मात्र, हाताला दुखापत झाल्याचे पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. एका नेटकऱ्याने विचारले, “नेमकं काय भाजलं?” त्यावर अपूर्वाने प्रतिक्रिया देत, “ग्लू-गनचा ग्लू हातावर पडला आणि भाजलं,” असे सांगितले.

नेटकऱ्यांनी व्यक्त केली काळजी
तसेच दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, “मलासुद्धा असंच घरी मखर करायला आवडतं, त्यामुळे हे लागल्याचं दुःख मी समजू शकतो.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “तुमचं सगळं कुटुंब असं एकत्रित बघून खूप चांगलं वाटत आहे.” तर एका नेटकऱ्याने, “फक्त गणपती असतात की गौराईसुद्धा असते,” असा प्रश्न विचारला आहे.
