Apurva Nemlekar on Supriya Pathare: लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियाच्या माध्यामातून प्रेक्षकांच्या संपर्कात असते. ती वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असते. आता अपूर्वाने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.

अपूर्वाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की सुप्रिया पाठारे अपूर्वाची ओटी भरत आहेत.शेवटी त्या तिला मिठी मारतात. अपूर्वा त्यांच्या पाया पडत त्यांचे आशीर्वाद घेते. त्यानंतर त्या दोघींचे सुंदर फोटो पाहायला मिळतात. दोघींच्याही चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. दोघींनी साड्या नेसल्या असून, पारंपरिक लूकमध्ये दोघीही सुंदर दिसत आहेत.

“कधी कधी नाती रक्ताच्या पलीकडची…”

हा व्हिडीओ शेअर करताना अपूर्वाने लिहिले, “कधी कधी नाती रक्ताच्या पलीकडची असतात आणि बाप्पाच्या कृपेने मला असंच एक अनमोल नातं मिळालंय.सुप्रिया ताई ही एक अत्यंत गुणी आणि दिग्गज अभिनेत्री आहे. पण त्याहूनही मोठ्या मनाची माझी लाडकी मोठी बहीण आहे.”

अपूर्वा नेमळेकर पतीसह (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)

पुढे तिने लिहिले, “विशेष म्हणजे आम्ही कधी एकत्र काम केलं नाही. तरीही आमचं नातं इतकं घट्ट कसं जुळलं हे फक्त बाप्पालाच ठाऊक आहे. वयाने, अनुभवाने त्या कितीतरी मोठ्या आहेत, पण त्यांचं प्रेम मात्र तितकंच निखळ आणि भरभरून देणारं आहे. यंदाच्या गणेशोत्सवात ताईच्या हातची ती मानाची ओटी मिळणं हे माझं खूप मोठं भाग्य समजते. ताईच्या घरात तो उत्सव, बाप्पाच्या साक्षीने झालेला तो सुंदर नाच आणि शेवटी ताईची मिळालेली माया,हा क्षण कायम माझ्या मनात राहील.”

शेवटी तिने लिहिले, “सुप्रिया ताई, खूप खूप प्रेम. तुझा आशीर्वाद आणि आपली ही सुंदर मैत्री अशीच कायम राहू दे. मला इतकी प्रेमळ ताई दिल्याबद्दल थँक यू बाप्पा”, असे म्हणत अभिनेत्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या.

अपूर्वा नेमळेकर (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)

अपूर्वाच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले,”खूप छान वाटलं”, आणखी एकाने लिहिले, “ताई छान दिसतेस”, एकाने लिहिले, “किती गोड”, आणखी एकाने लिहिले, “ताई तू खूप छान दिसतेस, कायम अशीच हसत राहा”, एकाने लिहिले, “मराठी परंपरा”, दुसऱ्याने लिहिले, “तू कायम अशीच हसत राहा”, अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी अपूर्वाचे कौतुक केले आहे.

अपूर्वा नेमळेकर (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)

दरम्यान, सुप्रिया पाठारे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. आजवर त्यांनी अनेक धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.