Apurva Nemlekar on husband Tanuj Govalkar: ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील शेवंता आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. २०१६ ला प्रदर्शित झालेल्या या मालिकेतील शेवंता लोकप्रिय ठरली. ही भूमिका अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने साकारली होती.

अपूर्वा नेमळेकरने प्रेमाची गोष्ट मालिकेतूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. तिने या मालिकेत सावनी ही भूमिका साकारली होती. काही दिवसांपासून अपूर्वा तिच्या भूमिकेसाठी नाही, तर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. १४ फेब्रुवारीला तिने लग्न केले. तनुज गोवळकर, असे तिच्या पतीचे नाव आहे.

“माझ्या १६ सोमवारचा प्रसाद…”

अपूर्वा नेमळेकर व तनुज गोवळकर यांनी नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत, अपूर्वाने तिच्या नवऱ्याची ओळख करून दिली. ती म्हणाली, “हा तनुज गोवळकर आहे. थोडक्यात सांगायचं तर, माझ्या १६ सोमवारचा प्रसाद म्हणता येईल. तो तितकाच प्रसादासारखा गोड आहे. समंजस आहे. काळजी करणारा आहे. मी नऊ वर्षांपासून सिंगल होते आणि आतुरतेने मी ज्या जोडीदाराची वाट पाहिली, जसा तो असायला हवा, जशी माझ्या डोक्यात संकल्पना होती. मला वाटतं तो तसाच आहे. मला वाटतं की, मॅनिफेस्टेशन कामी आलं. तो आता माझ्या आयुष्यात आहे.”

“अपूर्वा एक गोड व्यक्ती…”

मुलाखतीत पुढे तनुज अपूर्वाबद्दल म्हणाला, “अपूर्वा एक गोड व्यक्ती आहे. तिच्या भूमिकांमुळे ती रागीट असल्याचे लोकांना वाटते. ती स्पष्टवक्ती आहे, अशी तिची एक प्रतिमा आहे; पण ती मनाने ती खूप चांगली आहे. ती एक उत्तम व्यक्ती आहे.”

अपूर्वाने साकारलेली शेवंता ही भूमिका पाहिली आहे का, असे तनुजला विचारले गेले. त्यावर तो म्हणाला, “जिथे त्या मालिकेचे शूटिंग झाले, तिथे आम्ही गेलो होतो; पण शेवंता हे पात्र आणि रात्रीस खेळ चाले ही मालिका पाहिली नव्हती. म्हणजे मला माहीत होतं की, शेवंता हे पात्र लोकप्रिय आहे; पण त्यावेळी मी ते पाहिलं नव्हतं. नंतर आम्ही दोघांनी मिळून तिचं काम पाहिलं आहे.”

अपूर्वा म्हणाली, “आम्ही जेव्हा भेटलो, तेव्हा मी त्याला माझ्या कामाबद्दल सांगत होते. त्यावेळी मी सावनी हे पात्र साकारत होते. ते अत्यंत व्यग्र शेड्युल होतं. मी जेव्हा सांगत होते की, स्टोरीमध्ये ट्विस्ट आहे. माझं पात्र जे आहे ते रागीट आहे, घरच्यांना खूप त्रास देते. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर काहीच हावभाव नव्हते. तो फक्त ऐकत होता. जेव्हा मी त्याला शेवंता पात्राबद्दल बोलले, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले नाहीत. मला तिथेच समजलं होतं की, याला काहीही माहीत नाही. मी जे काही बोलतेय, त्याचा त्याच्याशी काही काडीमात्र संबंध नाही.”

तनुज कोणत्या क्षेत्रात काम करतो? यावर अपूर्वा म्हणाली, “तनुज एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करतो. त्याचा मनोरंजन क्षेत्राशी काहीही संबंध नाही. पण, जेव्हापासून आम्ही भेटलो आहोत, तेव्हापासून त्याला या क्षेत्रात खूप इंटरेस्ट आला आहे. तो मला रील्ससाठी वेगवेगळ्या कल्पना सुचवत असतो. मी जर काही स्क्रिप्टिंग करत असेल, तर त्यातही तो काहीतरी सुचवतो. आता आम्ही अलीकडे बऱ्याचशा रील्स करायला लागलो आहे. त्याचं एडिंटिंगही तोच करतो. मला गेल्या सहा-सात महिन्यांपासून माझ्या सोशल मीडियावर जे बघण्यात आलं आहे, ते त्यानंच एडिट केलं आहे.”

दरम्यान, अपूर्वा व तनुजच्या रील्सनादेखील प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते.