Apurva Nemlekar shares emotional post: अपूर्वा नेमळेकर ही मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने साकारलेल्या भूमिका गाजल्या आहेत. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील तिची शेवंता या भूमिकेने तिला वेगळी ओळख दिली. तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. २०१६ ला ही मालिका प्रदर्शित झाली होती, त्यानंतर अपूर्वाने ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारली होती. सावली या भूमिकेतून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते.
अपूर्वा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. ती तिच्या पतीबरोबर अनेक रील्स शेअर करत असते. रील्समधून ते चाहत्यांना खळखळून हसवते. अशातच अपूर्वाने अभिनय क्षेत्रात ३० मे २०२६ ला १५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अपूर्वाने काही फोटो शेअर करत लिहिले, “३० मे २०११, ‘आभास हा’चा पहिला एपिसोड याच दिवशी टीव्हीवर प्रसारित झाला होता आणि एका नवख्या अपूर्वाचा चेहरा महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचला होता. या अभिनय प्रवासाला तब्बल १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. नाटक, मालिका, चित्रपट, जाहिराती ते अगदी आजचे रील्स आणि एआय सीरिज माध्यमं बदलत गेली. पण, प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा आणि काहीतरी नवं देण्याचा माझा अट्टहास कधीच बदलला नाही.”
पुढे तिने लिहिले, “या १५ वर्षांत मी असंख्य वेगवेगळे लुक्स केले, वेगवेगळी पात्रे जगले. जे मला माझ्या खऱ्या आयुष्यात कधी जगता आलं नाही ते मी या पात्रांच्या माध्यमातून अनुभवलं आणि खरंच खूप मजा आली. या प्रत्येक पात्राने मला जगण्याची एक नवीन ऊर्जा दिली, नवी उमेद दिली आणि आयुष्याचं एक नवं ज्ञान दिलं. माझ्या भूमिकांनी मला समृद्ध केलं.”
“पडद्यावरच्या या प्रवासामागे पडद्याआड…”
तिला या प्रवासात साथ देणाऱ्यांबद्दल अपूर्वाने लिहिले, “पडद्यावरच्या या प्रवासामागे पडद्याआड खंबीरपणे उभे राहिलेले माझे हक्काचे लोक आहेत, ज्यांच्याशिवाय मी आज इथे नसते. पप्पा आणि मम्मी, तुम्ही माझ्या प्रत्येक स्वप्नावर माझ्याहून जास्त विश्वास ठेवलात. मला नेहमीच पाठिंबा दिलात. माझ्या भावाचे मनापासून आभार, ज्याने प्रत्येक वळणावर मला नवनवीन गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि आज, माझ्या या प्रवासाचा सर्वात सुंदर भाग असलेल्या तनुजचे आभार. तनुज, मला इतकं उत्तम पद्धतीने समजून घेतल्याबद्दल आणि प्रत्येक पावलावर माझा सर्वात मोठा सपोर्ट सिस्टम बनल्याबद्दल थँक्यू.”
शेवटी तिने प्रेक्षकांना उद्देशून लिहिले, “आतापर्यंत प्रेक्षकांनी माझ्या प्रत्येक कलाकृतीवर, माझ्या प्रत्येक भूमिकेवर भरभरून प्रेम केलं आहे. माझ्या या मायबाप प्रेक्षकांची मी मनापासून ऋणी आहे. तुमच्या प्रेमामुळेच फिनिक्स पक्षासारखं प्रत्येक आव्हानातून नव्याने उभं राहण्याची ताकद मला मिळाली. ही तर फक्त १५ वर्ष आहेत, प्रवास अजून सुरूच आहे. अजून खूप लांब जायचं आहे. खूप नवनवीन प्रयोग करायचे आहेत, अशीच साथ राहू द्या”, असे लिहित अपूर्वाने तिच्या भावना व्यक्त केल्या.
अपूर्वाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. नेटकऱ्यांनी तिच्या भूमिकांचे कौतुक केले आहे, तसेच काही आठवणी सांगितल्या आहेत. आता अभिनेत्री आगामी काळात कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
