Apurva Nemlekar : अपूर्वा नेमळेकर मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मुख्य नायिका आणि खलनायिका अशा विविध भूमिका तिने अनेक मालिकांमध्ये साकारल्या आहेत. तिच्या भूमिकांचं अनेकांनी कौतुकही केलं आहे. मात्र, ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील तिने साकारलेल्या शेवंता या भूमिकेचं विशेष कौतुक झालं. पण असं असतानाही तिला अर्ध्यातच ती मालिका सोडावी लागली.
‘झी मराठी’वरील ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. यातील अन्ना नाईक आणि शेवंता या पात्रांना तर विशेष पसंती मिळाली होती. परंतु, मेकर्सबरोबरचा वाद, अपमान यामुळे अपूर्वाला या मालिकेतून एक्झिट घ्यावी लागली असं तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. ती नेमकं काय म्हणाली याबद्दल जाणून घेऊयात…
अपूर्वाने सांगितलं ‘रात्रीस खेळ चाले’मधून एक्झिट घेण्यामागचं कारण
अभिजात मराठी फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत अपूर्वाने या सगळ्याबद्दल सांगितलं आहे. मुलाखतीत तिला अनेक जण अशावेळी शांत राहणं, काम न मिळण्याच्या भीतीपोटी काहीच न बोलणं पसंत करतात. पण, तू तसं केलं नव्हतंस तू तुझी भूमिका मांडली होती असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “वाईट तर वाटलं होतं. माझी साडी, दागिने दुसऱ्या अभिनेत्रीने परिधान करताना पाहून. माझ्या शिवाय जेव्हा पहिला भाग प्रसारित झाला तेव्हा खूप दु:ख झालं होतं. मला एवढीच अपेक्षा होती की जी कोणी अभिनेत्री आहे तिने निदान एक फोन करावा की नेमकं काय झालंय, काही समस्या होती का असं विचारणं अपेक्षित होतं कारण उद्या हे कोणाबरोबरही घडू शकतं”
‘रात्रीस खेळ चाले’मधून अपूर्वाने एक्झिट घेतल्यानंतर अभिनेत्री कृतिका तुळसकरची एन्ट्री झाली होती. कृतिकाबद्दल अपूर्वा पुढे म्हणाली, “तिच्यामध्ये कदाचित तितका समजुतदारपणा नसेल. तितकी कामाच्याबाबतीत ती प्रोफेशनल नसेल. पण, जेव्हा मला माझ्या निर्मात्याकडून आणि वाहिनीमधील त्या मोठ्या व्यक्तीकडून तू शेवंता साकारतेय यात काही फार ग्रेट नाही. दुसरी कोणतीही अभिनेत्री ते करूच शकते. असं सांगण्यात आलं त्यावेळेला अभिनेत्री म्हणून मी दुखावले होते. मला भयंकर त्रास झाला होता की इतका जीव ओतून केलेल्या कामाची दखल घेतली जात नाहीये आणि ते कोणीही करेन असं सांगण्यात आलेलं मग म्हटलं ठिके करुण दाखवावं.”
मालिकेचा टिआरपी घसरल्यानंतर अपूर्वाला निर्मात्याकडून पुन्हा फोन आला होता असं तिने यामधून सांगितलं आहे. अभिनेत्री म्हणाली, “एका आठवड्यातच जेव्हा टिआरपी घसरला तेव्हा मला फोन आला होता पण, मी खूपच दुखावले होते त्यामुळे मी नकार दिला. म्हटलं की तुम्ही ही झेप घेतली ना, आता त्याचे परिणाम दिसत आहेत म्हणून माझ्याकडे पुन्हा यायचं नाही.”
अपूर्वा पुढे म्हणाली, “खूप लोकांनी मला चूक करतीयेस तू, झी सारख्या मोठ्या वाहिनीच्या विरोधात उभी राहतेयस ते खूप मोठे लोक आहेत. चॅनेल चालवतात. मोठं प्रोडक्शन आहे तुला काम मिळणार नाही असं सांगण्यात आलं होतं. पण मला माहीत होतं की मी खरी आहे आणि त्यानंतर माझ्याकडे कामं आलीच.”
