‘रात्रीस खेळ चाले’, ‘आभास हा’, ‘प्रेमाची गोष्ट’ अशा विविध मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री म्हणजेच अपूर्वा नेमळेकर. वैयक्तिक आयुष्यात १४ फेब्रुवारी २०२६ रोजी तिने तनुज गोवळकरशी दुसरं लग्न केलं. त्याआधी जवळपास ९ वर्षे अपूर्वा एकटी आयुष्य जगत होती. दिवसभर शूटिंग, घरची जबाबदारी या सगळ्या जबाबदाऱ्या अपूर्वाने खंबीरपणे निभावल्या. आयुष्यात अनेक चढउतार आले पण, तरीही मी खचले नाही असं ती आवर्जून सांगते.
अपूर्वा सुलेखा तळवलकर यांना दिलेल्या मुलाखतीत म्हणते, “९ वर्षं मी एकटीने काढली…स्वत:ला सतत कामात झोकून दिलं होतं. महिन्याचे ३० च्या ३० दिवस मी काम करत होते. यामध्ये दैनंदिन मालिका, नाटक, इव्हेंट्स मी सगळीकडे काम केलं. तो माझ्या आयुष्यातला असा काळ होता…जेव्हा मी सगळ्यात लोकप्रिय भूमिका साकारत होते, जी होती शेवंताची. तेव्हा शेवंताची लोकप्रियता जगभरात होती. पण, मला मनापासून त्याचा आनंद घेता आला नाही कारण, वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच गोष्टी सुरू होत्या. मी माझ्या बाबांना गमावलं होतं…माझ्या धाकट्या भावाचं हार्ट अटॅकमुळे निधन झालं. तो २८ वर्षांचा होता. त्याच्या सात वर्षं आधी बाबा गेले..त्यामुळे घरात मी आणि आई दोघीच होतो. त्यामुळे तो काळ माझ्यासाठी खरंच खूप कठीण होता. लग्न करू की आईबरोबर राहू हे सुद्धा मला तेव्हा समजत नव्हतं. पण, तनुज माझ्या आयुष्यात आल्याने मी स्वत:ला खूप लकी समजते.”
लोकांना मी रागीट, उद्धट वाटते, पण…
अपूर्वा पुढे तिच्या स्वभावाबद्दल म्हणाली, “लोकांना मी रागीट, उद्धट, चिडचिड करणारी वाटते पण, एकदा माझा प्रवास पाहा. तुम्ही ९ वर्षं सगळं एकट्याने सांभाळताय. घरचा कारभार बघताय, एकट्याने ट्रॅव्हल करताय, यादरम्यान…तुम्ही अशी भूमिका साकारताय जी शेवंतासारखी आहे. यामुळे अनेकांना असंही वाटतं की, She is easily available. अशा परिस्थितीत तुम्ही डिवोर्सी पण आहात. या सगळ्या गोष्टींना एकत्र तोंड देणं हे सोपं नव्हतं. म्हणूनच कदाचित मी कणखर झाले आणि सर्वांना मी रागीट वगैरे किंवा अगदीच स्पष्टपणे बोलणारी वाटते. मग, मी विचार केला…आता कोणाला जे वाटायचंय ते वाटूदेत. पण, आता ९ वर्षांनी जेव्हा मी माझ्या हक्काच्या व्यक्तीला भेटले…तेव्हा मला जाणवलं, अरे मी किती हळवी आहे. माझ्यातली ही बाजू मी कधी पाहिलीच नव्हती.”
“माझं पहिलं लग्न वयाच्या २६ व्या वर्षी झालं होतं. त्यामुळे तेवढी मॅच्युरिटी नव्हती. हळुहळू जेव्हा मग रिअॅलिटी हिट करते तेव्हा मग जाणवतं…लग्नाचा अर्थ बराच वेगळा आहे. तुम्ही जेव्हा शुअर असाल की आपण एखाद्याला कमिटमेंट देऊ शकतो, आपल्याला ज्या व्यक्तीसमोर आपल्या भावना काहीही न लपवता व्यक्त करता येतात…त्याला आपण लग्न म्हणतो. आता वयाच्या ३७ व्या वर्षी मी हे लग्न केलं ( दुसरं लग्न ) आता परिस्थिती पूर्णपणे बदललीये. या सगळ्यात ९-१० वर्षे गेल्यावर मी माणूस म्हणूनही बदलले. आता अपूर्वाला एक नवीन शेप मिळालाय. त्यामुळे आता गोष्टी वेगळ्या आहेत. मी देवाचे दररोज आभार मानते…आणि दररोज तनुजला सांगते, की माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे.” असं सांगत अपूर्वाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
