Apurva Nemlekar upcoming project: आपल्या आवडत्या कलाकारांना विविध भूमिकांमध्ये पाहण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. कलाकारही कधी सकारात्मक, कधी नकारात्मक, कधी विनोदी अशा विविध भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. प्रत्येक भूमिकेचे एक वेगळे महत्त्व असते, प्रत्येक पात्राची खोली वेगळी असते; त्यामुळे विविध भूमिका साकारण्यासाठी कलाकार उत्सुक असल्याचे पाहायला मिळते.
अपूर्वा नेमळेकरने शेअर केली पोस्ट
आता अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर लवकरच एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामधील तिचा लूक, तिचा पेहराव, चेहऱ्यावरील भाव सर्वकाही लक्ष वेधून घेत आहे.
अपूर्वाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिचा एक वेगळा लूक पाहायला मिळत आहे. तिने सुंदर साडी नेसली आहे. गळ्यात दागिने घातले आहेत. नाकात नथ आहे, कपाळावर टिकली आणि केस बांधलेले आहेत. तसेच, ती रोखून बघत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिचा हा लूक लक्ष वेधून घेत आहे. अपूर्वा या लूकमध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे.
याबरोबरच या पोस्टरवर अपूर्वा नेमळेकर प्रस्तुत पद्मिनी असे लिहिले आहे. अपूर्वाच्या मागे संपूर्ण अंधार दिसत असून पुढे एक कंदील पाहायला मिळत आहे. याबरोबरच, या पोस्टरवर असेही लिहिले आहे, “ती दिसते पण सगळ्यांना नाही.” हे पोस्टर शेअर करत अभिनेत्रीने इलेव्हन मीडियालादेखील टॅग केले आहे.
ही पोस्ट शेअर करताना तिने लिहिले, “रात्र झाली की… ती येते, गाव तिला घाबरतं, पण ती कोणालाच घाबरत नाही; पद्मिनी, लवकरच”, असे लिहित तिच्या या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगितले आहे. पोस्टर आणि अभिनेत्रीने दिलेल्या कॅप्शनवरून हा हॉरर प्रोजेक्ट असल्याचे दिसत आहे. तसेच, अपूर्वा पद्मिनी हे पात्र साकारणार असल्याचेही समोर आले आहे.
नेटकरी म्हणाले…
आता अपूर्वाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “शेवंता परत आलीये”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “शेवंता पार्ट २”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “मी आता वाट पाहू शकत नाहीये”, एकाने लिहिले, “खूप उत्सुक आहे, पुन्हा आम्हाला आमचं गाव, कोकण पाहायला मिळेल”, एकाने लिहिले, “तू खूप टॅलेंटेड अभिनेत्री आहेस. तू या भूमिकेला नक्की न्याय देशील आणि आम्हाला छान कलाकृती पाहायला मिळेल”, एकाने लिहिले, “आमच्यासाठी शेवंताच”, आणखी एकाने लिहिले, “पद्मिनीची वाट पाहत आहे”, आणखी एकाने लिहिले, “वाह! बेस्टच”, अशा अनेक कमेंट्स अपूर्वाच्या पोस्टवर पाहायला मिळत आहेत. अनेकांनी तिला एका नवीन भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले आहे; तर अनेकांना अपूर्वाचा हा लूक पाहिल्यानंतर तिच्या शेवंता या भूमिकेची आठवण आली आहे.






अपूर्वाने ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत शेवंता ही भूमिका साकारली होती. तिची शेवंता ही भूमिका चांगलीच गाजली होती. त्यानंतर ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत ती दिसली होती.
दरम्यान, आता अपूर्वाने हा प्रोजेक्ट नेमका काय आहे, तो कधीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. आता ती याबद्दल कधी खुलासा करणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
