Arbaz Patel on Marriage With Nikki Tamboli: ‘बिग बॉस’, ‘स्प्लिट्सविला’, ‘खतरों के खिलाडी’, ‘रोडीज’, ‘द ५०’ हे रिअॅलिटी शो कायमच विविध कारणांमुळे लक्ष वेधून घेतात. या शोमध्ये सहभागी होणारे स्पर्धक, त्यांना दिले जाणारे टास्क, त्यांच्यात निर्माण होणारे नातेसंबंध यांबरोबरच मतभेद, भांडण, प्रेम या सगळ्या गोष्टींमुळे असे रिअॅलिटी शो कायमच चर्चेत असतात.

काही स्पर्धक अशा रिअॅलिटी शोमध्ये प्रेमातही पडतात. त्यातील मोजकेच शोनंतरही त्यांच्यातील नाते टिकवतात. त्यामध्ये बिग बॉस १५ मध्ये सहभागी झालेले करण कुंद्रा व तेजस्वी प्रकाश, बिग बॉसच्या ९ व्या सीझनमध्ये सहभागी झालेले प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी अशी काही उदाहरणे आहेत. ज्यांनी रिअॅलिटी शोनंतरही त्यांच्यातील नाते टिकवून ठेवले. त्यामध्ये अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी या जोडीचेही नाव घेतले जाते.

अरबाज पटेल व निक्की तांबोळी हे बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांच्यात मैत्री झालीआणि ते प्रेमातही पडले. शो संपल्यानंतर त्यांनी त्यांच्या नात्याची कबुली दिली. सोशल मीडियावर ते अनेकदा एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करताना दिसतात. एकमेकांना पाठिंबा देतात. नुकतेच ते द ५० या शोमध्येदेखील सहभागी झाले होते.

Award Banner

आता द ५० या शोनंतर अरबाज पटेलने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत द ५० शो, त्यात झालेले वाद, करिअर, तसेच निक्की तांबोळीबरोबरचे नाते, ते लग्न कधी करणार याबद्दल वक्तव्य केले. आता अरबाज निक्कीबरोबर लग्न कधी करणार, याबद्दल नेमकं काय म्हणाला आहे, हे जाणून घेऊ…

“लवकरच मुहूर्त…”

अरबाज पटेलने नुकतीच ‘फिल्मीग्यान’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत लग्न कधी करणार, असा प्रश्न विचारला गेला. त्यावर अरबाज म्हणाला, “तुम्ही आमच्याबद्दल इतका चांगला विचार करता, ते पाहून खूप आनंद होतो. तर लवकरच मुहूर्त बघितला जाईल. कोणता मुहूर्त चांगला आहे, हे पाहून त्या मुहूर्तावर लग्न करू; पण सध्या ही वेळ काम करण्याची आहे. यश कमावण्याची आहे. हे वय व वेळ पैसे कमावण्याचे आहे. आयुष्यात पुढे जाण्याचे आहे. तर, गोष्टी जितक्या लवकर चांगल्या होतील, तितक्या लवकर आम्ही धुमधडाक्यात लग्न करू”, असे म्हणत अरबाज पटेलने उत्तर दिले.

दरम्यान, निक्की तांबोळी व अरबाज पटेल म्युझिक व्हिडीओंमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येतात. आता आगामी काळात ते कोणत्या प्रकल्पामध्ये दिसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.