Nikki Tamboli & Arbaz Patel Relationship : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांची एकमेकांशी ओळख झाली होती आणि शोमध्येच या दोघांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली. निक्की-अरबाजचं नातं फक्त शोपुरतं मर्यादीत आहे असं बऱ्याच जणांनी म्हटलं होतं. पण, सगळ्यांचे समज खोटे ठरवत ही जोडी गेल्या दीड वर्षांपासून एकत्र आहे. तसेच नुकतंच अरबाजने नॅशनल टेलिव्हिजनवर ‘The 50’ शोमध्ये निक्कीला प्रपोज केलं आहे. यावेळी अभिनेत्रीला अश्रू अनावर झाले होते कारण, या दोघांचं हे नातं निक्कीच्या वडिलांना मान्य नाहीये. ती नेमकं काय म्हणालीये पाहुयात…
अरबाज निक्कीला प्रपोज करताना म्हणाला, “आम्ही आजवर एकमेकांना प्रपोज केलेलं नाहीये किंवा असं जाहीरपणे आमचं नातं मान्यही केलं नव्हतं. कलर्स वाहिनीच्या ‘बिग बॉस मराठी’ शोमध्ये आमची ओळख झाली, आम्ही भेटलो आणि आता कलर्सच्या या ‘The 50’ शोमध्ये मला निक्कीला प्रपोज करण्याची संधी मिळाली आहे. निक्की तू खूप स्ट्राँग आहेस…मी सुद्धा स्ट्राँग आहे पण, माझ्या रागावर माझं नियंत्रण नव्हतं. जेव्हा मी तुला पाहतो तेव्हा मी आपोआप शांत होतो. आय लव्ह यू निक्की…माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.”
अरबाजने प्रपोज केल्यावर निक्कीने होकार दिला. यावेळी तिला अश्रू अनावर झाले होते. कारण, निक्कीच्या घरी या दोघांचं नातं मान्य नाहीये.
निक्की भावना व्यक्त करत म्हणाली…
निक्की म्हणाली, “या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहिली होती. पण, मला थोडी भीती वाटत होती कारण, आम्हा दोघांचे धर्म वेगळे आहेत. गेल्या दीड वर्षांपासून आम्ही एकत्र आहोत पण, माझ्या वडिलांनी हे नातं अजूनही स्वीकारलेलं नाहीये. मी माझ्या वडिलांच्या विरोधात जाऊन हे नातं निभावण्याचा निर्णय घेतला होता. कारण, माझी आई कायम मला हेच सांगत आलीये की, प्रेमात कधीच कोणासाठी सॅक्रिफाइज करू नकोस. वडिलांचं प्रेम वेगळं आहे आणि जोडीदाराचं प्रेम वेगळं…मला अशी आशा आहे की, माझे बाबा सुद्धा या गोष्टी समजून घेतील. कारण, अरबाजवर माझं खूप प्रेम आहे.”
दरम्यान, निक्की-अरबाजची जोडी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. दोघंही एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. पण, या दोघांनी जाहीरपणे पहिल्यांदाच प्रेमाची कबुली दिल्याचं पाहायला मिळालं.

