गोरेगाव येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडून १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे. या खंडणीतील पहिला हप्ता म्हणून दीड कोटी रुपये स्वीकारत असतानाच मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघींनाही अटक केली. हेमलता बाणे (३९) आणि अमरीना मॅथ्यू फर्नांडिस (३३) अशी अटक करण्यात आलेल्या दोघींची नावं आहेत.
यापैकी हेमलता बाणे ही मराठी अभिनेत्री व नृत्यांगना म्हणून ओळखली जाते. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील कांचन देशमुख म्हणजेच अभिनेत्री अर्चना पाटकर यांची हेमलता बाणे सून असल्याचं म्हटलं जात होतं. त्यांचे फोटोही सर्वत्र व्हायरल झाले आहेत. मात्र, याप्रकरणी अर्चना पाटकर यांनी सविस्तर पोस्ट शेअर करत आपली बाजू स्पष्ट केली आहे. “माझा मुलगा हेमलता बाणेपासून ४ वर्षांपूर्वी विभक्त झालाय” असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच “घटस्फोटाची केस सुरू असल्याने आमच्या कुटुंबाशी तिचा कोणताही संबंध नाही” असंही अर्चना यांनी स्पष्ट केलं आहे.
अर्चना पाटकर पोस्ट शेअर करत लिहितात, “मायबाप प्रेक्षकांना तसेच मीडियाला नमस्कार, मी गेली ४० वर्षे या सिनेसृष्टीत कार्यरत आहे. मी नेहमीच माझं काम अत्यंत प्रामाणिकपणे केलं आहे. पण, सध्या मीडियाच्या माध्यमातून मला काही बातम्या समजल्या. हेमलता बाणे हिने मागितलेल्या दीड कोटी खंडणीबद्दल चर्चा होतेय आणि त्यात माझं नाव आणि फोटो वापरले जात आहेत. मी तमाम मीडियाला सांगू इच्छिते की, माझा मुलगा ४ वर्षांपासून तिच्यापासून विभक्त झाला आहे. कोर्टात त्यांच्या घटस्फोटाची केस सुरू आहे म्हणून मी यावर काही टिप्पणी करणार नाही. त्यामुळे आमच्या कुटुंबाशी तिचा कोणताही संबंध नाही. कृपया माझ्या नावाचा आणि फोटोचा गैरवापर करू नका. धन्यवाद!” अर्चना यांनी शेअर केलेल्या पोस्टवर आता चाहते देखील कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांच्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात एका हॉटेलमध्ये हा वाद सुरू झाला होता. साखरपुड्याच्या पार्टीत लेझर लाईटच्या वापरावरून या महिला आणि बिल्डरच्या मुलामध्ये वाद झाला होता. बिल्डरच्या मुलावर खोटे आरोप करत या महिलेनं आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गुन्हा दाखल होताच हेमलता पाटकर आणि अमरीना असं नाव सांगणाऱ्या दोघींनी बिल्डर आणि मुलाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. ही तक्रार मागे घेण्यासाठी आधी १० कोटी रुपयांची मागणी त्यांनी केली. तडजोडीनंतर साडेपाच कोटी रुपये देण्याचं ठरलं. यानंतर बिल्डरने गुन्हे शाखेकडे तक्रार केली, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सापळा रचला आणि २३ डिसेंबर रोजी लोअर परळ परिसरात या खंडणीचा पहिला हप्ता स्वीकारताना या दोन महिलांना पकडलं.
दरम्यान, या खंडणी प्रकरणातील आरोपींनी याआधीही अशा स्वरूपाचे गुन्हे केले आहेत का, याची सखोल चौकशी आवश्यक असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितलं. सध्या पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
