Archana Puran Singh Diet and lifestyle changes : सामान्य माणूस असो किंवा सेलिब्रिटी हल्ली डाएट, व्यायाम, फिटनेस या गोष्टी अनेकांच्या चर्चेचा विषय असतात. त्यात मनोरंजनविश्वात काम करणाऱ्या मंडळींना स्क्रीनवर छान दिसण्यासाठी आणि फिटनेस जपण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. प्रत्येक सेलिब्रिटी वेगवेगळे डाएट, फिटनेस ट्रेनिंग घेत असतात. अशातच आता अभिनेत्री अर्चना पूरण सिंह यांनीसुद्धा त्यांच्या डेली रूटीनबद्दल सांगितलं आहे.

सेलिब्रिटींचा डेली रूटीन कसा असतो, ते कधी काय खातात, काय खात नाही याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. अशातच आता अभिनेत्री अर्चना पूरण सिंह यांनीसुद्धा तयांच्या डेली रूटीनबद्दल आणि डाएटबद्दल सांगितलं आहे. अर्चना नेमकं काय म्हणाल्या आणि त्यांचा डाएट प्लॅन कसा असतो याबद्दल जाणून घेऊयात…

कशी असते अर्चना पूरण सिंह यांची दिनचर्या?

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार अर्चना पूरण सिंह या १५ दिवसांच्या बेंगळुरूमधील आयुर्वेदिक रिट्रीटनंतर परतल्या आहेत. त्यांनी आता स्वतःसाठी ठरवलेली नवी दिनचर्या सांगितली. त्या म्हणाल्या, “माझ्यासाठी आता सगळं बंद आहे. मी गोड खात नाही, मैद्याचं खात नाही, तळलेलं खात नाही. रात्री १०–११ वाजता झोपते आणि संध्याकाळी ७ वाजता जेवण करते.” हा अनुभव त्यांनी त्यांचा मोठ्या मुलगा आर्यमान सेठीच्या यूट्यूब व्लॉगमध्ये कुटुंबीयांशी बोलताना शेअर केला.

अर्चना पूरण सिंह यांनी सांगितलेल्या त्यांच्या दिनचर्येबद्दल तज्ज्ञांकडून माहिती मिळाली आहे. इंडियन एक्स्प्रेसबरोबर याबद्दल संवाद साधताना आहारतज्ज्ञांनी सांगितलं की अशा प्रकारचा ठरवून केलेला बदल ५० आणि ६० वयोगटातील लोकांसाठी, विशेषतः अनियमित खाण्यापिण्याच्या सवयी किंवा तणावानंतर, खूप उपयोगी ठरू शकतो.

अतिरिक्त साखर, मैदा आणि तळलेले पदार्थ कमी केल्याने शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते, पचन सुधारतं आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते. लवकर रात्रीचं जेवण केल्याने शरीराला झोपण्यापूर्वी अन्न पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. त्यामुळे चयापचय सुधारतो आणि झोपेची गुणवत्ता वाढते. अशी माहिती आहारतज्ज्ञांनी दिली आहे.

दरम्यान, अर्चना पूरण सिंह या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांचा स्वत:चा यूट्यूब चॅनेल आहे ज्यामधून त्या त्यांच्या दैनंदिन जीवनातील घडामोडींबद्दलची माहिती द्यायच्या. पण, आा त्यांनी काही दिवसांसाठी यूट्यूब चॅनेलमधून ब्रेक घेतला आहे. याबद्दल त्यांनी व्हिडीओ शेअर करत माहिती दिलेली.