अर्चना पूरण सिंह हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक कलाकृतींमध्ये काम करत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अर्चना यांनी लग्न केलं तेव्हासुद्धा त्या चांगली कामं करत होत्या आणि त्यांना तोपर्यंत लोकप्रियता मिळालेली. परंतु, त्यांचे पती परमीत सेठी मात्र त्यावेळी इंडस्ट्रीत स्थिरावले नव्हते आणि संघर्ष करत होते.
दूरदर्शनवरील १९८७ मध्ये प्रदर्शित झालेली अर्चना पूरण सिंह यांची पहिली मालिका ‘मिस्टर या मिसेस’, ज्याचं दिग्दर्शन जलाल आघा यांनी केलं होतं, ही मालिका नोकरी करणारी पत्नी आणि पती (हाऊस हजबंड) यांच्या आयुष्यावर आधारित होती. विशेष म्हणजे, पुढे त्यांच्या वैवाहिक आयुष्याच्या सुरुवातीच्या काळाशी या मालिकेतील कथानक इतकं जुळेल, याची त्यांना कल्पनाही नव्हती. या मालिकेनंतर त्यांची अभिनेता परमीत सेठी यांच्याशी भेट झाली आणि १९९२ मध्ये दोघांनी लग्न केलं. अर्चना त्या वेळी इंडस्ट्रीत स्थिरावलेल्या आणि अनुभवी अभिनेत्री होत्या, तर परमीत स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करत होते. त्यामुळे घरची आर्थिक जबाबदारी प्रामुख्याने अर्चना यांच्यावरच होती, अगदी ‘मिस्टर या मिसेस मधील त्यांच्या भूमिकेप्रमाणे.
याबद्दल बोलताना अर्चना हसत म्हणाल्या, “मी कधीच असा संबंध जोडला नव्हता. तुम्हीच तो जोडत आहात.” मात्र, त्यांनी हेही मान्य केलं की, परमीतच्या लग्नाच्या प्रस्तावाला त्यांनी दिलेलं स्पष्ट आणि थेट उत्तर त्यांच्या दिग्दर्शकीय पदार्पणातील २०१० च्या ‘बदमाश कंपनी’ या चित्रपटात वापरण्यात आलं. शाहिद कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट त्यांच्या लग्नानंतर तब्बल १८ वर्षांनी प्रदर्शित झाला.
अर्चना यांनी लग्नापूर्वी ठेवलेल्या दोन अटी
अर्चना म्हणाल्या, “परमीतने बदमाश कंपनी लिहिला होता. चित्रपटात जेव्हा शाहिद कपूर अनुष्का शर्माला प्रपोज करतो, तेव्हा ती म्हणते, मी कधीच स्वयंपाकघरात जाणार नाही आणि बेडवर ओले टॉवेल्स पडलेले मला चालणार नाहीत. हे वाक्य माझंच होतं.”
यावर अर्चना पुढे हसत म्हणाल्या, “आजही मी स्वयंपाकघरात जात नाही.” कुटुंबाबरोबरचे त्यांचे व्लॉग त्या आजही त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याचं दिसतं. परमीत सेठी आणि त्यांची दोन मुलं आर्यमान व आयुष्मान यांच्याबरोबरच्या व्हिडिओंमध्येही हे अनेकदा पाहायला मिळतं.
