Archana Puran Singh son Ayushmaan Sethi relationship : सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अर्चना पूरन सिंह या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून त्यांचे कुटुंब व्लॉगच्या माध्यमातून अपडेट शेअर करत असतात. त्यांचा मोठा मुलगा आर्यमान सेठीच्या ‘आर्य व्लॉग्स’ (Aary Vlogs) हा चॅनल लोकप्रिय असून आता त्यांचा धाकटा मुलगा आयुष्मान सेठीनेही स्वतःचे चॅनेल सुरू केले आहे. नुकताच शेअर केलेल्या त्याच्या एका व्हिडीओमध्ये आयुष्मानने त्याची गर्लफ्रेंड व योग प्रशिक्षक समीक्षा शेट्टीबरोबरचे रिलेशनशिपबद्दल सांगितले.
आयुष्मानची गर्लफ्रेंड समीक्षा ही त्याच्यापेक्षा वयाने सहा वर्षांनी मोठी असून मागील काही महिन्यांपासून ती त्याच्याच घरी राहत असल्याचा खुलासा आयुष्मानने स्वतः केला आहे. तसेच समीक्षा व आयुष्मानची ओळख ही अभिनेत्री योगिता बिहानीमुळे झाली असून ती आर्यमनची होणारी पत्नी आहे. आयुष्मान व समीक्षा हे दीड वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असून अर्चना पूरन सिंह यांनी या नात्याबद्दल मत व्यक्त केले.
अर्चना पूरन सिंह यांची मुलाच्या रिलेशनशिपबाबत काय होती प्रतिक्रिया?
अर्चना यांनी सांगितले की, जेव्हा त्यांना जाणवले की आयुष्मान व समीक्षा यांचे नाते घट्ट झाले असून पुढे एकत्र राहण्यासाठी ते तयार झाले आहेत, तेव्हा एक आई म्हणून त्यांनी मुलाला महत्त्वाचा सल्ला दिला होता. अर्चना म्हणाल्या, “मी आयुष्मानला म्हणाले होते, ‘आयुष, तू तिच्याबद्दल आणि रिलेशनशिपबद्दल गंभीर होत चालला आहेस. नशिबाने चांगली मुलगी भेटत असते आणि जर तुला चांगली मुलगी भेटली असेल, तर मग ‘योग्य वेळ’ किंवा ‘मी अजून तयार नाही’ असल्या गोष्टींचा विचार करू नकोस, कारण ती खरोखरच खूप चांगली मुलगी आहे.”


पुढे अर्चना म्हणाल्या, “तुला खूप चांगली मुलगी भेटली आहे, तेव्हा तू त्या चांगुलपणाची जाणीव ठेवली पाहिजेस आणि ते नाते नेहमी जपण्याचा प्रयत्न केला पाहिजेस.” अर्चना पूरन सिंह यांचे पती परमीत सेठी यांनीही मुलाच्या नात्याचे कौतुक केले आणि ते म्हणाले, “तुम्ही दोघं एकमेकांना पूर्ण करता. हे एक स्ट्राँग, सुंदर आणि सकारात्मक असे नाते आहे.”

आयुष्मान आणि समीक्षा यांनी त्यांच्या नात्याबद्दल सांगितले की, सुरुवातीला समीक्षाला आयुष्मान हा लहान मुलासारखा वाटत होता. त्यावेळी ती तिच्या ‘देवदास फेज’मधून जात होती आणि दोघेही नुकतेच वाईट नात्यांमधून बाहेर पडले होते. त्यानंतर, हळूहळू दोघांची ओळख झाली आणि चांगली मैत्री झाली. समीक्षाला आयुष्मानचा स्वभाव समजूतदार वाटू लागला. समीक्षाची तब्येत बिघडल्यानंतर आयुष्यान तिच्याबरोबर राहिला. त्यानंतर दोघांनी फ्रान्स व पोर्तुगालला ट्रीप केली, तसेच त्यानंतर समीक्षाने सेठी कुटुंबाबरोबर लंडनचाही प्रवास केला आणि ती कुटुंबाच्या जवळ आली.
