Archana Puran Singh : सोशल मडियाच्या काळात अनेक सेलिब्रिटी कंटेंट क्रिएशनही करत असतात, ज्यामार्फत ते चांगले पैसेही कमावतात. असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांचे सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्मवर लाखो चाहते आहेत. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री अर्चना पूरण सिंह आणि त्यांचं कुटुंब. अर्चना पूरण सिंह व त्याची दोन मुलं आणि पती ही मंडळी त्यांचं स्वत:च यूट्यूब चॅनेल चालवतात. त्यामार्फत ते त्यांच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी आणि वेगवेगळ्या ठिकाणांचे खाद्यपदार्थांचे व्हिडीओ पोस्ट करत असतात. त्यांच्या चॅनेलला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आला आहे. परंतु, आता अर्चना व त्यांच्या कुटुंबीयांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

काय म्हणाल्या अर्चना पूरण सिंह?

यूट्यूब चॅनेलचे एक दशलक्षांहून अधिक सबस्क्रायबर्स असतानाही त्यांनी हा निर्णय घेतला आहे. १० मार्च रोजी मंगळवारी शेअर केलेल्या त्यांच्या लेटेस्ट व्हिडीओमधून त्यांनी याबद्दल सांगितलं आहे. अर्चना म्हणाल्या, “आम्हाला एक गोष्ट सगळ्यांना सांगायची आहे. ही वाईट बातमी नाहीये; पण एक वर्षापू्र्वी आम्ही हे चॅनेल सुरू केलेलं. पण, आता आम्हाला ब्रेक घ्यायचा आहे. आम्हाला आराम करायचा आहे. काही दिवसांनंतर आम्ही पुन्हा सुरू करू.”

अर्चना यांची मुलं यावेळी म्हणाली, “पुढे आम्ही काहीतरी नवीन घेऊन येऊ, ज्यामुळे तुम्हालाही मजा येइल. गेल्या एक वर्षात आम्ही जे केलं, त्यामधून आम्हाला खूप आनंद मिळाला.” यावेळी त्यांचा मुलगा आर्यमान म्हणाला, “माझ्या वैयक्तिक चॅनेलवरून मी व्हिडीओ करत असेन.” त्यावर अर्चना म्हणाल्या की, हो, त्याच्या चॅनेलवर व्हिडीओ येत राहतील. तुम्हाला आम्ही त्यातून भेटूच.आपका परिवार पुन्हा तुमच्या भेटीला येईल. धन्यवाद!

अर्चना व त्यांची दोन मुलं आणि पती अनेकदा एकत्र व्लॉग करत असतात. वेगवेगळ्या ठिकाणी ते खायला जातात आणि तेथील चविष्ट आणि चांगल्या पदार्थांबद्दल सांगत असतात. ही मंडळी अनेकदा त्यांच्या घरीसुद्धा वेगवेगळे पदार्थ बनवतात आणि त्याचे व्हिडीओ बनवून पोस्ट करत असतात. अर्चना व त्यांच्या कुटुंबीयांचे हे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. अर्चना पूरण सिंह यांच्या या व्हिडीओखाली कमेंट्स करीत त्यांना शुभेच्छा दिल्या गेल्या आहेत.

दरम्यान, अर्चना यांच्याबद्दल बोलायचं झालं, तर पूर्वी त्या कपिल शर्माच्या शोमुळे चर्चेत असायच्या. त्यानंतर स्वत:चं चॅनेल सुरू केल्यानंतर त्या पुन्हा चर्चेत आल्या. तेव्हापासून त्या सातत्यानं कुठल्या न कुठल्या कारणामुळे चर्चेत असतात.