Actress Aarti Singh weight loss journey & diet secrets : हल्ली लग्न सोहळ्यांमध्ये मुलींचा ब्रायडल लूक, त्यांचे आउटफिट, मेकअप या गोष्टी अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. अभिनेत्रीसुद्धा त्यांच्या लग्नामध्ये कशा पद्धतीच्या लूकला पसंती देत आहेत याबद्दल चर्चा रंगते. अशातच आता ‘बिग बॉस १३’मुळे प्रसिद्धीझोतात आलेली टेलिव्हिजनवरील अभिनेत्री आरती सिंहने नुकतंच लग्नाआधी वजन कमी करण्यासाठी केलेल्या वेगळ्या डाएटबद्दल खुलासा केला.
अनेक अभिनेत्री स्क्रीनवर फिट दसण्यासाठी मेहनत घेत असतात, डाएट करत असतात पण आरती सिंहने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, लग्नाच्या फोटोंमध्ये फिट दिसावं म्हणून ती शिस्तबद्ध आहार घेत होती. तिने खास पद्धतीचा डाएट केल्याचं म्हटलं आहे. तिचा हा डाएट कसा होता, तिने वजन कसं कमी केलं याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
आरतीने २० दिवसात कसं घटवलं वजन?
‘अल्फा टॉक्स’शी संवाद साधताना आपल्या ट्रान्सफॉर्मेशनबद्दल बोलताना आरतीने सांगितलं की, नेहमीच्या रात्रीच्या जेवणाऐवजी दुधी भोपळा खाल्ल्यामुळे शरीर हलकं राहिलं आणि कॅलरीही नियंत्रणात राहिल्या. तिने यावेळी रात्रीच्या जेवनात साध्या भाज्या खाऊन आणि सातत्य ठेवल्याने फक्त २० दिवसांत ५ किलो वजन कमी केलं.
आरती म्हणाली, “मी त्यात कोणतेही जास्त मसाले घातले नाहीत. फक्त सैंधव मीठ आणि कोथिंबीर घातली. सगळं प्रेशर कुकरमध्ये शिजवलं आणि नंतर दुधी भोपळा मॅश केला.” तिने पुढे सांगितलं, “मला माहित होतं की माझं लग्न होणार आहे. आयुष्यात हा क्षण एकदाच येतो, त्यामुळे लग्नाच्या फोटोंमध्ये मला सडपातळ दिसायचं होतं.”
दुधी भोपळा कमी कॅलरीची, पाण्याने आणि फायबरने भरपूर असलेली भाजी मानली जाते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्या लोकांमध्ये भारतीय घरांमध्ये ती लोकप्रिय आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार अदिती आपटे यांनी सांगितलं की, सलग २५ दिवस दररोज रात्री दुधी भोपळ्यासारखा कमी कॅलरीचा पदार्थ खाल्ल्यास वजन कमी होऊ शकतं, पण “हा सर्वात आरोग्यदायी किंवा दीर्घकाळ टिकणारा मार्ग नाही.”
उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार अशा कडक डाएटमुळे सुरुवातीला जे वजन कमी होतं, ते बहुतेक वेळा शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे असतं, कारण शरीरात कार्बोहायड्रेटचा साठा कमी होतो. तसंच, काही काळ कॅलरी कमी घेतल्यामुळे थोडी चरबीही कमी होऊ शकते.
