Artists Express Feelings on Mumbai Train Accident: ठाण्यानजीकच्या मुंब्रा या स्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकल गाडीतून पडून चार प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राजकीय नेत्यांसह कलाकारांनीदेखील शोक व्यक्त केला. तसेच त्यावर त्यांचे मतदेखील व्यक्त केले आहे.

अभिजीत चव्हाण, श्रुजा प्रभुदेसाई, विद्याधर जोशी, स्वानंदी टिकेकर यांनी नुकताच ‘तारांगण’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबई रेल्वे दुर्घटनेवर वक्तव्य केले.

कलाकार काय म्हणाले?

अभिजीत चव्हाण म्हणाले, “मला खूप धक्का बसला होता. माणसाच्या जीवाची काही किंमत नाही. किड्या-मुंग्यासारखी माणसं मरत आहेत, याला काही अर्थ नाहीच. माणसं कामावर चालली आहेत, घरी परतत आहेत, त्यांना माहितीच नाही की पुढच्या वळणावर आपलं मरण उभं आहे. इतकी बेफिकिरी असू नये. मुंबई ही धावतेय, पळतेय, धडपतेय, पुन्हा सावरते, उभी राहते; पण काहीतरी समोरच्यांच मोल ठेवलं पाहिजे.”

स्वानंदी टिकेकर म्हणाली, “मी ग्रँट रोडलाच लहानाची मोठी झाली आहे. त्यामुळे मी ट्रेनने बऱ्याचदा फिरली आहे. पण, ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. ही खूप दु:खद घटना आहे. यावर आपण काय उपाय करू शकतो. खंत व्यक्त करण्याशिवाय आपल्याकडे काय पर्याय आहे. फार फार तर आपण मुंबई सोडून जाऊ शकतो, कारण मुंबईत जो गोंधळ होतोय, गर्दी होतेय, त्यात माझाही सहभाग आहे, कारण मी इथे राहते. मग हे जर कमी करायचं असेल तर मला बाहेर जावं लागेल. नाहीतर फक्त खंत व्यक्त करून काय उपयोग? काहीतरी केलं पाहिजे.”

विद्याधर जोशी म्हणाले, “मुंबईत सध्या खूप इमारती बांधल्या जात आहेत. लोकांची राहण्याची सोय होत आहे. मला कळत नाही की इतक्या लोकांना मुलभूत सुविधा वीज, पाणी, रस्ते कुठून निर्माण करणार? मला प्रश्न पडतो की, माझ्यासारख्या सामान्य माणसाला जो प्रश्न पडतो, ते प्रश्न राज्यकर्त्यांच्या मनात येत नसतील का? तर येत असणारच, पण तरीसुद्धा ते दुर्लक्ष करून विकास करत आहेत. त्यामुळे नक्की कसला विकास होतोय, याची मला काळजी वाटते. विकास कोणाला नको असतो? पण, तुम्ही कशाच्या किमतीवर विकास साधताय, हेही तितकंच महत्त्वाचं असतं.”

मुंबई दुर्घटनेबाबत विद्याधर जोशी म्हणाले, “कोणाला मुद्दाम लोकलच्या दारात लटकत प्रवास करायला आवडेल? कोणालाच आवडणार नाही. पण, परिस्थिती अशी असते की काय करणार? बरं त्या दुर्घटनेत जे लोक मरण पावले, ते पहिल्यांदाच लोकलच्या दरवाजात उभं राहून प्रवास करत नसतील, ती रोज लटकत असतील. मुळात व्यवस्थेमध्ये कुठेतरी गडबड आहे, असं मला वाटतं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रुजा प्रभुदेसाई म्हणाल्या, “लहानपणापासून मुंबईतच राहिल्यामुळे हे काहीतरी वेगळं घडतंय, ही जाणीवच खूप बोथट झालेली आहे. त्यामुळे गर्दी असणार, त्याच गर्दीत चढायचं आणि उतरायचं आहे. हा प्रवास असाच करावा लागणार आहे, हा विचार डोक्यात असल्याने मला गर्दीचा त्रास झाला नाही. उलट ज्यांना गर्दीचा त्रास होतो, त्यांचा मला राग येतो. कारण ट्रेनमध्ये चढल्यानंतर काही महिला त्रासल्यासारख्या वागतात. मग मला वाटतं की अशांनी कारने प्रवास करावा, कारण गर्दीदेखील आता झाली आहे, ती गर्दी सेट व्हायला थोडा वेळ लागतो.”