‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेतील पूर्वी देशमुखच्या भूमिकेमुळे अभिनेत्री आशा नेगी घराघरात पोहोचली. मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी आणि मुंबईत येण्याआधी तिने करिअरची सुरुवात केली होती. उत्तराखंडमध्ये २००९ साली तिने ‘मिस उत्तराखंड’चा किताब जिंकला होता. नुकतंच आशाने मुलाखतीत तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल आठवणी सांगितल्या. यावेळी तिने टीव्ही इंडस्ट्री सोडण्यासाठी काही काळ ब्रेक घेतल्याबद्दलही भाष्य केलं. तसेच अभिनेत्रीने आयुष्यातील खडतर प्रवासाबद्दलही सांगितलं.
स्क्रीनशी संवाद साधताना आशा नेगीने अभिनेत्री बनण्याचं स्वप्न पाहत असतानाच्या दिवसांच्या आठवणी सांगितल्या. ती म्हणाली, “मला लहानपणापासूनच अभिनेत्री, हिरोईन बनायचं होतं. मी प्रीती झिंटा, करीना कपूर यांना पाहायचे आणि त्यांच्यासारखं बनण्याचं स्वप्न पाहायचे. पण हे स्वप्न पूर्ण होईल, असं मला कधीच वाटलं नव्हतं. कारण आम्ही देहरादूनमधील मध्यमवर्गीय कुटुंबातून होतो आणि इंडस्ट्रीत आमची कोणाशीही ओळख नव्हती. मी मिस उत्तराखंड स्पर्धेत सहभागी झाले आणि जिंकले. त्यामुळे माझ्यातही काहीतरी आहे, असा आत्मविश्वास मला मिळाला.”
कुटुंबाचा विरोध, भावाचं निधन आशाने सांगितला खडतर प्रवास
मात्र, आशाने अभिनय क्षेत्रात जाण्याच्या निर्णयाला तिच्या कुटुंबाचा पूर्णपणे विरोध होता. तिला स्वतःला सिद्ध करण्यासाठी तीन महिन्यांची संधी देण्यात आली होती. ती म्हणाली, “माझ्या बहिणींचाही या निर्णयाला विरोध होता, त्यामुळे त्यांनी माझ्याशी बोलणंही बंद केलं होतं. माझी आई थोडी घाबरलेली असायची, कारण माझ्या जन्माआधीच माझ्या एका भावाचं निधन झालं होतं. तिने मला मसुरीलाही कधी एकटं जाऊ दिलं नव्हतं. पण मुंबईला जाणं माझ्यासाठी गरजेचं आहे, हे समजून घेणारी ती पहिली व्यक्ती होती.” आशाने पुढे सांगितलं, “माझ्या आई-वडिलांनी परवानगी दिली होती, पण त्यांनी मला स्वतःला सिद्ध करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली. एका महिन्याच्या आतच मला एका मालिकेत छोटी भूमिका मिळाली. त्यानंतर बडे अच्छे लगते हैंमध्ये आणखी एक भूमिका मिळाली आणि मग पवित्र रिश्तामध्ये पूर्वीची भूमिका मिळाली. माझ्या वर्गातील एक मुलगी आधीपासूनच मुंबईत ऑडिशन देत होती. त्यामुळे वेगवेगळ्या ऑडिशनसाठी जाण्यासाठी मला एक साथीदार मिळाली.” मुंबईत सुरुवातीला आल्यानंतर आशाला टीव्ही मालिकांमध्ये काम करायचंच नव्हतं. ती म्हणाली, “सुरुवातीला मी टीव्ही मालिका करणार नाही, फक्त जाहिराती आणि चित्रपटांमध्ये काम करेन, अशा विचारात होते. मला काहीच माहिती नव्हतं, पण माझा आत्मविश्वास खूपच जास्त होता. कोणीतरी मला समजावण्याचा प्रयत्न केला की हे इतकं सोपं नाही, त्यामुळे एखादी छोटी भूमिका मिळाली तरी ती स्वीकारायला हवी. आजही मला त्यावेळचा माझ्यातील तो उत्साह आणि जिद्द आठवते.”
काही वर्षांपूर्वी ‘पवित्र रिश्ता’ मालिका सोडून टीव्ही इंडस्ट्रीपासून जाणूनबुजून दूर राहण्याच्या निर्णयाबद्दल विचारलं असता, आशा नेगीने सांगितलं, “मी पवित्र रिश्ता मालिका सोडली कारण रोजचं काम खूपच एकसारखं वाटू लागलं होतं. मी या मालिकेत तीन वर्षे काम केलं होतं. त्यानंतर मी काही रिअॅलिटी शो केले आणि सतत काम करण्याची मला सवय झाली होती. जे काम मिळत होतं, ते मी करत होते. त्यानंतर एका महिन्याच्या आत माझे दोन शो बंद झाले. तो माझ्यासाठी एक जागरूक करणारा क्षण होता. त्यामुळे आता कोणताही शो करायचा नाही, फक्त स्वतःवर काम करायचं, असं मी ठरवलं.”


आशाने पुढे सांगितलं, “इंडस्ट्रीत येण्यापूर्वी मी काहीच शिकले नव्हते. मी सेटवरच सगळं शिकले. यशापेक्षा अपयशातून माणूस जास्त शिकतो. मी चांगले चित्रपट पाहिले, अभिनयाच्या कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला आणि एक व्यक्ती म्हणून स्वतःवरही काम केलं. तो माझ्यासाठी आव्हानात्मक आणि कठीण काळ होता. त्यामुळेच हा ब्रेक घ्यावा लागला.” काही वर्षे डेली सोप्सपासून दूर राहिल्यानंतर आशा नेगीने ‘बारीश’, ‘क्रिमिनल जस्टीस ३’, ‘अभय ३’ यांसह अनेक ओटीटी प्रोजेक्ट्समध्ये काम केलं. नुकतीच ती जिओ हॉटस्टारच्या ‘अली बाबा और ४० भूम’मध्ये दिसली होती.
