Ashok Saraf & Nivedita Saraf Cannes 2026 : अशोक व निवेदिता सराफ यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सध्या मराठी कलाविश्वाची ही एव्हरग्रीन जोडी कान्सला पोहोचली आहे. हे दोघंही कान्सच्या रेड कार्पेटवर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासह अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर ( कोकण हार्टेड गर्ल ) सुद्धा कान्सला पोहोचली आहे. या चौघांचा ‘भारत पव्हेलियन’मधील व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. यासह अंकिताने फ्रान्समधून आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
कान्सचं रेड कार्पेट म्हटल्यावर प्रत्येक दिवशी सेलिब्रिटी कोणता नवीन लूक करणार याकडे सर्वांचं लक्ष असतं. त्यामुळे साहजिकच उपस्थित महिला कलाकारांमध्ये फॅशन, ग्लॅमर, मेकअप असे सगळे विषय सुरू असतात. यांच्याबरोबर एकाच गाडीतून प्रवास करताना अशोक सराफ यांना सुद्धा या सगळ्या गप्पा ऐकायला मिळाल्या.
त्यामुळे निवेदिता सराफ यांनी एक प्रश्न विचारून त्यांची फिरकी घेतली. त्या विचारतात, “अशोक आमच्या तिघींबरोबर बसून तुला कसं वाटतंय?” यावर अशोक सराफ यांनी संस्कृतमध्ये एका शब्दांत उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “मी आता ‘किंकर्तव्यविमूढ’ झालो आहे.”
साहजिकच संस्कृत शब्द असल्याने पटकन याचा अर्थ कोणाला समजला नाही. त्यामुळे अशोक सराफ पुढे म्हणाले, “याचा अर्थ खूपच डिटेलमध्ये आहे…’किंकर्तव्यविमूढ’ म्हणजे नेमकं काय करू हेच सुचत नाही ( गोंधळलेली अवस्था- काय करावे किंवा काय कर्तव्य आहे, याबाबत गोंधळात पडणे )”
याबाबत अंकिता वालावलकर सांगते, “याचं कारण म्हणजे आम्ही सगळ्याजणी मेकअप वगैरे बद्दल बोलत असतो. त्यामुळे त्यांचं असं झालेलं आहे.”
हा अंकिताने शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आता हे मराठी कलाकार रेड कार्पेटवर कोणता लूक करून एन्ट्री घेणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान, “हा माझ्यासाठी स्वप्नवत क्षण आहे. मी माझी उत्सुकता शब्दांत व्यक्त करू शकत नाही. आज या मंचावर उभं राहणं माझ्यासाठी सर्वात मोठा अभिमान एका गोष्टीचा आहे, मी माझ्या मराठीचं प्रतिनिधित्व करतेय.” असं अंकिताने फ्रान्सला निघताना पोस्ट शेअर करत लिहिलं होतं.
