Ashok MaMa serial off air: मराठी सिनेसृष्टीत महत्त्वाचे योगदान असलेले अशोक सराफ हे त्यांच्या विविध भूमिकांतून कायमच लक्ष वेधून घेतात. आजपर्यंत त्यांच्या कॉमेडी भूमिकांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. मात्र, त्यांनी गंभीर भूमिकाही साकारल्या आहेत. विविध धाटणीच्या भूमिकांमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली.

गेल्या वर्षभरापासून अशोक सराफ हे अशोक मा.मा या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. या मालिकेतील त्यांची गंभीर भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. कडक शिस्तीचे असणारे, लोकांना कठोर वाटणारे पण तितकेच मृदू, सत्याची साथ देणारे, मुलाची चूक असेल तर सुनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या अशोक माजगावकरांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

अशोक सराफ यांच्याबरोबरच या मालिकेत रसिका वाखारकर, निवेदिता सराफ, चैत्राली गुप्ते, नेहा शितोळे, शुभवी गुप्ते असे अनेक कलाकार या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसले.

सर्वच कलाकारांच्या भूमिकांचे वेळोवेळी कौतुक झाले. निवेदिता सराफ यांची काही दिवसांपूर्वी मालिकेत एन्ट्री झाली होती. आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेचा शेवटच्या भागाचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

‘अशोक. मा.मा.’च्या शेवटच्या भागात काय पाहायला मिळणार?

कलर्स मराठी वाहिनीने अशोक मा. मा. या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, अशोक मा.मा. आणि निवेदिता हे लग्न करतात, ते एकमेकांच्या गळ्यात हार घालतात.

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, गृहप्रवेश करताना निवेदिता उखाणा घेतात. त्या म्हणातात, “सगळ्यांच्या प्रेमाखातर लग्नाला झाले राजी, अशोकरावांचं नाव घेते, ईरा आणि ईशानची निवी आजी”, पुढे अशोक मा.मा. उखाणा घेत म्हणतात, “शिस्त म्हणजे शिस्त देत होतो मी न्यारा, बॅगवाल्या निवेदितांनी शिकवला जगण्याचा मंत्र खरा.” पुढे अशोक मा.मा. आणि निवेदिता गृहप्रवेश करतात, माजगावकरांचे संपूर्ण घर आनंदी असल्याचे पाहायला मिळते.

अशोक मा. मा. या मालिकेचा शेवटचा भाग १० जानेवारीला प्रसारित होणार आहे. ही मालिका २५ नोव्हेंबर २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. दरम्यान, ११ जानेवारी २०२६ पासून बिग बॉस मराठीचा सहावा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.