Ashvini Mahangade on Maharashtra Drought: अश्विनी महांगडे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या संपर्कात असते. ती विविध व्हिडीओ शेअर करते. कधी ते मालिकेच्या सेटवरील असतात, कधी कार्यक्रमातील तर कधी शेतातील व्हिडीओही शेअर करते. चाहतेही तिच्या व्हिडीओंवर कमेंट्स करत तिला प्रतिक्रिया देत असतात.

आता अश्विनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत तिच्या भावना व्यक्त केला आहे. व्हिडीओमध्ये अश्विनी शेतात बसली असल्याचे दिसत आहे. तिने पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केल्याचे दिसत आहे.

“आज नवरात्रीचा दुसरा दिवस…”

या व्हिडीओमध्ये अभिनेत्री म्हणाली, “आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. आजचा रंग पांढरा आहे. हा पांढरा रंग आजकाल मला नेहमी मळलेला पांढरा दिसतो. कारण आपण बघतोय की महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यांना मदत करण्याची इच्छा तर खूप आहे. पण, त्यांचं सांत्वन करून भागणार नाही. तर हा दिवस मला वाटतं की सर्व शेतकऱ्यांसाठी आहे. कारण- ते आपल्या सगळ्यांचेच अन्नदाता आहेत. त्यांच्यासाठी आजचा दिवस समर्पित करणं, फार गरजेचं आहे. त्या प्रत्येत स्त्रीला, जी आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून लढते. शेती करते, कसते. सगळ्यांना ताटात पोटभर मिळावं याची सोय करते, तिला हा दिवस समर्पित केला पाहिजे.”

हा व्हिडीओ शेअर करताना अश्विनीने, “नवरात्री, दिवस २. रंग-पांढरा, जय किसान”, अशी कॅप्शन दिली आहे. अश्विनीच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

स्वराज्यरक्षक संभाजी, आई कुठे काय करते, घरोघरी मातीच्या चुली, अस्मिता अशा मालिकांमधून अश्विनीला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. मालिकांबरोबरच ती चित्रपटांमध्येही काम करते. आता आगामी काळात ती कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.