Ashwini Kalsekar Shared Her Struggle Story : हिंदी टेलिव्हिजनवरील खलनायिकांचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा तेव्हा मराठमोळ्या अश्विनी कळसेकर यांचं नाव आवर्जुन घेतलं जातं. त्यांनी मालिकांमध्ये त्यांच्या दमदार भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांचा अभिनय इतका खरा वाटायचा की, काहींना तर त्यांची खरोखर भीती वाटायची. फक्त मालिकाच नव्हे, तर त्यांनी हिंदी चित्रपटांतही विविध भूमिका साकारल्या आहेत.

अश्विनी कळसेकर व त्यांचे पती मुरळी शर्मा हे दोघेही मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहेत. दोघांनी नुकतीच ‘कर्ली टेल्स’ला मुलाखत दिली. यावेळी अश्विनी कळसेकर यांना त्यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास कसा सुरू झाला याबद्दल विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की, त्या आधी फ्लाइट अटेंडन्ट म्हणून काम करायच्या आणि हेमा मालिनी यांनी त्यांना संधी दिली. अश्विनी यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास कसा सुरू झाला याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

अश्विनी कलसेकर यांनी सांगितला संघर्षकाळ

मुलाखतीत अश्विनी म्हणाल्या, “आतापर्यंतसुद्धा माझं आयुष्य प्लॅन केलेलं नाहीये. हो माझं एक स्वप्न नक्कीच होतं की, मला कथ्थकचे क्लासेस सुरू करायचे होते. मी आशा जोगळेकरजी व अर्चना जोगळेकरजी यांच्याकडून कथ्थकचं प्रशिक्षण घेतलं. त्या माझ्या गुरू आहेत. हेमा मालिनी कथ्थक शिकलेल्या मुली शोधत होत्या आणि म्हणून माझी त्यांच्याबरोबर भेट झाली.”

अश्विनी पुढे म्हणाल्या, “हेमा मालिनींबरोबर त्यांच्या क्लासिकल बेलीसमध्ये १५-१६ वर्षांची असताना मी होते आणि त्यानिमित्त जगभरात फिरता आलं. त्याचदरम्यान मी कॉलेजमध्ये असताना एअर लाइन्सचा फॉर्म भरला होता. मग मला बोलावण्यात आलं. माझी मुलाखत झाली आणि मग हेमा मालिनींची क्लासिकल बेली सोडून मी ही नोकरी करायला सुरुवात केली आणि पुढे मी इंडियन एअरलाइन्समध्येही काम केलं. मी कॅबिन क्रू म्हणून काम करायचे”.

अश्विनी पुढे त्याबद्दल म्हणाल्या, “असंच एकदा मैत्रिणीबरोबर तिच्या एका ऑडिशनला गेले होते. मला शुक्रवारी सुट्टी असयाची. तिथे कबीर भाटिया नावाचा माणूस होता. देव त्याचं भलं करो. त्यानं माझा आवाज ऐकला तिथे आणि म्हटलं की, बाहेर कोण आहे? तुला अभिनय करायला आवडले का? मी म्हटलं की, मी कॅबिन क्रू आहे. माझ्याकडे वेळ नाहीये. त्यानं मला तुला ऑडिशन द्यायला आवडेल का, असं विचारलं. मला ऑडिशन म्हणजे काय हेही नीट माहीत नव्हतं. मी तसं विचारलं आणि म्हटलं की, मला फक्त शुक्रवारीच सुट्टी असते. त्यांनी मला शुक्रवारी राजकमल स्टुडिओमध्ये बोलावलं.”

अभिनेत्री पुढे म्हणाल्या, “मी सुरुवातीला शुक्रवारी काम करायचे. मग हळूहळू वाहिन्या सुरू झाल्या. शांती हा माझा पहिला शो होता. मग हळूहळू एअर लाईन सुटलं आणि २०१६ पर्यंत मी टेलिव्हिजनवर खूप काम केलं.”