Avinash Narkar shares Cooking Video: मालिका आणि नाटक यांबरोबरच कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. लोकप्रिय अभिनेते अविनाश नारकरही सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांच्या अनेक रील्स व्हायरल होत असतात.

आता अविनाश नारकर यांनी इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी प्रसादाचा शिरा बनवला असून, त्याचा अनुभव कसा होता, याबद्दलही सांगितले. व्हिडीओमध्ये ते किचनमध्ये असल्याचे दिसते. ते म्हणतात, “घरात कोणीही नाही आणि त्यामुळे मी प्रसादाचा शिरा बनवत आहे.” ते शिरा बनवण्यासाठी उत्साही असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. तिथेच एक ताट ठेवले आहे. त्यामध्ये शिरा बनविण्यासाठी कापलेली केळी, रवा आणि इतर साहित्य दिसत आहे.

अविनाश नारकर यांनी पहिल्यांदाच बनवला प्रसादाचा शिरा

अविनाश नारकर म्हणातात, “सगळी तयारी करून घेतोय. ड्रायफ्रुट्स घेतले आहेत, केळी कापून घेतली आहेत. रवा, तूप घेतले आहे.” त्यानंतर ते गॅसवर कढई ठेवतात आणि त्यात दोन चमचे तूप टाकून, त्यामध्ये रवा भाजून घेतात. नंतर त्यात दूध आणि साखर घालून, ते सगळं व्यवस्थित एकजीव करून घेतात. मग त्यात कापलेल्या केळ्यांचे तुकडे टाकतात. अशा रीतीने शिरा तयार केल्यानंतर ते असेही सांगतात की, केळ्यांचा छान सुगंध येतोय. त्यानंतर ते देवासमोर शिरा ठेवतात. देवासाठी स्वत: प्रसाद तयार केल्याच्या आनंदाची अनुभूती त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते.

हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिले, “पहिल्यांदाच प्रयत्न केलेला प्रसादाचा शिरा इतका अप्रतिम झाला की, ऐश्वर्याचीही घसघशीत शाबासकी मिळाली. त्यामुळे खूप खूप आनंद झाला.”

पुढे त्यांनी लिहिले, “खरंच स्वयंपाक हीसुद्धा एक कलाच आहे. सगळे आवश्यक ते जिन्नस अगदी अचूक मापात एकत्र आणले की, तयार होणारा पदार्थ चविष्ट तर हमखास होणार. पण, चाखणाऱ्यांच्या कौतुकास आणि शाबासकीस पात्रही ठरणार. हाती घेतलेलं काम आपण प्रसन्न चित्तानं, एकाग्रतेनं आणि पूर्ण आनंद घेऊन केलं की, आपल्या मनाबरोबरच इतरांच्या अंतःकरणातही समाधान अन् संतुष्टीचे बगीचे फुलवू शकतो.”

शेवटी त्यांनी लिहिले, “बोला गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. ऐश्वर्यानं सांगितलंय पुढच्या वेळी घरच्या श्री सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद तूच करायचास.”

अविनाश नारकर यांच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. “मस्त”, “अरे वाह”, “कमाल”, “शिरा चांगला बनवता येतो”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, अविनाश नारकर सध्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ आणि ‘तारिणी’ या मालिकांत महत्त्वाच्या भूमिकांत दिसत आहेत.