Avinash Narkar on Aishwarya Narkar: मनोरंजनसृष्टीतील काही जोड्या या लोकप्रिय आहेत. यामधील ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर यांचीदेखील एक जोडी आहे. त्यांनी आजवर अनेक मराठी हिंदी सिनेमांत काम केले आहे. सध्या ते विविध मालिकांतदेखील काम करताना दिसतात. त्यांच्या भूमिका कायमच लक्ष वेधून घेतात.

अविनाश नारकर गेल्या काही काळापासून झी मराठी वाहिनीवरील ‘तारिणी’ आणि स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या दोन मालिकांत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. त्यांच्या दोन्ही मालिकांतील भूमिकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळताना दिसते.

ऐश्वर्या नारकर नुकत्याच ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर हे त्यांच्या कलाकृतींबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चाहत्यांच्या संपर्कात असतात. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यांच्या डान्सची अनेकदा चर्चा होते; तर या जोडप्याच्या फिटनेसचे कायम कौतुक होताना दिसते.

“मला खूप उत्स्फूर्तपणे जगायची सवय आहे”

आता अविनाश नारकर यांनी नुकताच राजश्री मराठीशी संवाद साधला. या मुलाखतीत पत्नी ऐश्वर्या नारकर त्यांना कोणती गोष्ट शिकवू शकल्या नाहीत, याबद्दल त्यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले, “एक बदल जो ती माझ्यात करू शकली नाही, तो बदल म्हणजे शिस्तीचा आहे. ती मला अजूनही शिस्त लावू शकली नाही. मला वाटतं की त्या बाबतीत प्रत्येकाने आपापलं स्वातंत्र्य अनुभवावं, उपभोगावं; कारण मला कुठलीही गोष्ट अशी धरून ठेवून जगता येत नाही. मला खूप उत्स्फूर्तपणे जगायची सवय आहे. तिचं उलट आहे. तिला गोष्टी ठरवून आणि ठरल्याप्रमाणे लागतात. मला तसं वाटत नाही. मी टीव्ही, मोबाईलवर काही बघत असेल आणि मला त्यातून आनंद मिळत असेल तर मी ते बघतो. रात्री दोन-तीन वाजेपर्यंत बघतो. सकाळी उठून आपल्याला कामावर जायचे आहे हे सुद्धा मी विसरून गेलेलो असतो. त्या क्षणाचा आनंद मला लुटायचा असतो. आहे त्या क्षणात जगायला मला खूप आवडते. तिचं असं असतं की, आता झोप नाही तर परत सकाळी उशिरा उठशील, आपल्याला उशीर होईल वगैरे, असं तिचं म्हणणं असतं.” पुढे ते असेही म्हणाले की, तिच्याकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.

दरम्यान, आता ऐश्वर्या नारकर यांची नवीन भूमिका प्रेक्षकांना आवडणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.