Avika Gor left India settled in Bangkok : अभिनय क्षेत्रातील अनेक कलाकार हे नंतर परदेशांमध्ये स्थायिक होत आहेत. चित्रपटातील शूटिंगपुरते ते भारतामध्ये परत येतात आणि परदेशात वास्तव्य करीत असतात. त्यामध्ये बॉलीवूडमधील अनेक कलाकारांसह आता मालिकाविश्वातील कलाकारांचाही समावेश होत आहे. ‘बालिका वधू’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अत्यंत लोकप्रिय अभिनेत्रीनेदेखील देश सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ती परदेशामध्ये स्वतःचे घर घेऊन राहत आहे. मात्र, तिने भारत आणि राहत घर का सोडले, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. अभिनेत्रीने याबाबत स्वतः खुलासा केला आहे.

बालिका वधू या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अविका गौर हिने देश सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तिने भारत सोडून पतीसह परदेशामध्ये राहण्यास सुरुवात केली आहे. अविका गौर ही पती मिलिंद चांदवानीसह बँकॉकमध्ये शिफ्ट झाली आहे. अविकाने करिअर आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असताना देश सोडण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच तिच्या चाहत्यांसाठी तो मोठा धक्का मानला जात आहे.

अविकाने २१ जून २०२५ रोजी तिचा प्रियकर मिलिंद चांदवानी याच्याशी विवाह केला. लग्नापूर्वी ते सात वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. या जोडीने आता बँकॉकमध्ये घर खरेदी केले असून, दोघेही कायमचे बँकॉकमध्ये राहण्यास गेले आहेत. अविकाने स्पष्ट केले की, अविकाने हे सांगितले की, ती कायमस्वरूपी बँकॉकला स्थायिक झाली असली तरी ती भारतामध्ये काम सुरू ठेवणार आहे.

अविका गौरने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला मुलाखत देताना सांगितले की, हे खरे आहे की, मी आणि मिलिंद बँकॉकला स्थायिक झालो आहोत. आम्ही तिथे एक घरही विकत घेतले आहे, जे मी माझ्या आवडीनुसार सजवत आहे. मला आणि मिलिंदला वाटले की, तिथे त्यांच्या कामाच्या चांगल्या संधी आहेत. आणि खरं सांगायचं तर, मलाही हे ऐकून खूप चांगलं वाटलं. आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी आम्ही नेहमीच एकमेकांना पाठिंबा दिला आहे. आम्ही सात वर्षांपासून एकमेकांना डेट करीत असतानाही जर मला असा एखादा चांगला प्रोजेक्ट मिळाला आणि त्यासाठी मला अनेक महिने दूर राहावे लागत असेल, तर तो पूर्णपणे पाठिंबा देत असे. त्यामुळे आता मी त्याच्या प्रगतीत अडथळा आणावा, असे मला वाटत नाही, असे अभिनेत्री अविका गौरने सांगितले.

मालिकाविश्वामध्ये अविका गौर हे प्रचलित नाव आहे. त्यामुळे करिअरच्या शिखरावर असताना देश सोडल्याच्या निर्णयावर अविकाने तिची भूमिका स्पष्ट केली. “मी देश जरी सोडत असले तरी माझे मनोरंजन विश्वातील काम थांबलेले नाही. मी कामासाठी भारतामध्ये येणार आहे. मी मुंबईत असतानाही हैदराबाद, राजमुंद्री किंवा विशाखापट्टणम या ठिकाणी शूटिंगसाठी प्रवास करत असे. माझ्या लक्षात आले की, मुंबई हेच माझे मुख्य केंद्र असायला हवे, असे नाही. मी मुंबईत येऊन जवळपास एक महिना झाला आहे आणि कामासाठी बहुतेक वेळा हैदराबादला जाते. मी कामासाठी दिलेला शब्द हेच माझे प्राधान्य असणार आहे. कारण- त्यामुळेच मी आज या स्थानापर्यंत पोहोचले आहे”, अशा भावना अभिनेत्री अविका गौर हिने व्यक्त केल्या आहेत.