Bandini Fame Actress Aasiya Kazi blessed with baby girl: बंदिनी’ ही लोकप्रिय मालिका आठवतेय? या मालिकेत संतू धर्मराज ही मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री आसिया काझी आई झाली आहे. लग्नानंतर दीड वर्षांनी आसियाने ही गुड न्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

आसिया काझी हिने २९ नोव्हेंबर २०२४ रोजी अभिनेता गुलशन नैन याच्याशी आंतरधर्मीय लग्न केलं. त्यानंतर आता आसिया व गुलशन यांनी आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं आहे. आसियाने मुलीला जन्म दिला आहे. आपल्या पहिल्या बाळाच्या आगमनानंतर आसिया व गुलशन यांचा आनंद गगनात मावत नाहीये.

आसिया व गुलशन यांच्या मुलीचा जन्म २० जून रोजी झाला. लेकीचा फोटो शेअर करत आसियाने लिहिलं, “देवा, तिच्या रूपाने आमच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद. आम्ही तिचं चांगल्या रितीने संगोपन करण्यासाठी सर्वस्वी प्रयत्न करू.” आसियाच्या या पोस्टवर तिचा पती गुलशननेही कमेंट केली आहे. “आणि अशा रितीने जून आता माझा आवडता महिना झाला आहे,” असं त्याने लिहिलं.

पाहा आसिया काझीची पोस्ट

दरम्यान, गुलशन नैन व आसिया काझी यांचे चाहत्यांनी अभिनंदन केले आहे. तसेच आई-वडील म्हणून त्यांच्या या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

८ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर केलेलं आंतरधर्मीय लग्न

आसिया व गुलशन यांची पहिली भेट सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये झाली होती. तिथेच दोघांची मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले. हे दोघेही आठ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. आसिया व गुलशन यांच्या नात्याला त्यांच्या कुटुंबियांचा विरोध होता. दोघांचे धर्म वेगळे असल्याने त्यांच्या कुटुंबियांना त्यांचं नातं मान्य नव्हतं. त्यांच्या कुटुंबियांनी खूप विरोध केला, मात्र गुलशन व आसियाने एकमेकांची साथ सोडली नाही आणि पारंपरिक हिंदू पद्धतीने लग्न केलं. आता हे दोघेही एका गोंडस मुलीचे आई-बाबा झाले आहेत.

आसिया काझीचे करिअर

आसिया काझी हिने ‘बंदिनी’ या मालिकेत मुख्य भूमिका केली होती. रोनित रॉय, मृणाल जैन, शार्दूल पंडित, रसिका, जोशीसारखे कलाकार या मालिकेत होते. तसेच आसियाने ‘माटी की बन्नो’, ‘हिटलर दीदी’, ‘बालिका वधू’, ‘ये है आशिकी’ या तिच्या मालिका आहेत. तर गुलशनने ‘शौर्य और अनोखी की कहानी’ मध्ये काम केलं आहे. सध्या दोघेही बाळाच्या जन्माचा आनंद साजरा करत आहेत.