प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री इशा सिंहने तिच्या करिअरसाठी वडिलांनी केलेल्या त्यागाबद्दल खुलासा केला आहे. मुळची मध्य प्रदेशची राजधानी भोपाळची असलेली इशा आई व भावाबरोबर मुंबईत राहते, तर तिचे वडील भोपाळला राहतात. इशाच्या करिअरसाठी तिच्या वडिलांनी आईला तिच्यासोबत पाठवलं व ते एकटेच राहत आहेत.
इशा तिच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे आणि तिला त्यांच्यासोबत वेळ घालवायला आवडते. ईशा भोपाळमध्ये मोठी झाली असून नुकतीच ती तिच्या वडिलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी घरी गेली होती. अभिनेत्रीने तिच्या शूटमधून एक दिवस सुट्टी घेतली आणि वडिलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिच्या आई आणि भावासोबत भोपाळला गेली. ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत इशा सिंह म्हणाली, “कुटुंबासोबत वेळ घालवणं खूप छान होतं. माझ्या वडिलांनी आमच्या घराचे नूतनीकरण करून आम्हाला एक सरप्राईज दिले होते. त्यांनी माझी खोली तशीच ठेवली, कारण त्यांना माहीत होतं की त्यात खूप आठवणी आहेत. आम्ही नेहमी सण आणि वाढदिवस एकत्र साजरे करतो.”




कोणत्या महिलेसाठी बिपाशाची फसवणूक करशील? करण जोहरच्या प्रश्नावर जॉन अब्राहम म्हणाला होता, “फक्त…”
इशा पुढे म्हणाली, “मी, माझी आई व भाऊ मुंबईत राहतो आणि माझे वडील जे बांधकाम व्यावसायिक आहेत कामासाठी भोपाळमध्ये राहतात. मला अभिनय करायचा होता. त्यामुळे मी माझ्या आई आणि भावासोबत मुंबईत आलो. माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी खूप त्याग केला. ते माझ्या करिअरमध्ये मदत करण्यासाठी वेगळे राहत आहेत.” यावेळी पहिल्यांदा मुंबईत आल्यानंतर ती वर्षभर रडत होती, पण नंतर मात्र या शहराने तिला स्वीकारलं, असंही ती म्हणाली.
‘इश्क का रंग सफेद’ मधील धानी ही भूमिका साकारून इशा सिंहने तिच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने ‘सिर्फ तुम’, ‘इश्क सुभान अल्लाह’ सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं. सध्या ती अलौकिक शक्तींवर आधारित ‘बेकाबू’ या शोमध्ये ‘परी’ नावाची भूमिका साकारत आहे.