‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘भाग्य दिले तू मला’ने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. २०२२पासून सुरू झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांचं दोन वर्ष मनोरंजन केलं. तन्वी मुंडले, विवेक सांगळे, निवेदिता सराफ यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेचा चाहता वर्ग खूप मोठा होता. पण २२ एप्रिलपासून या मालिकेची जागा स्पृहा जोशीच्या ‘सुख कळले’ मालिकेने घेतली. आता लवकरच ‘कलर्स’वर आणखी एक नवी मालिका सुरू होतं आहे; ज्यामध्ये ‘भाग्य दिले तू मला’मध्ये झळकलेली अभिनेत्री पाहायला मिळणार आहे.

‘कलर्स मराठी’ने २५ एप्रिलला एका नव्या मालिकेची घोषणा केली. ‘अबीर गुलाल’ असं नव्या मालिकेचं नाव आहे. ‘कलर्स कन्नडा’ वरील ‘लक्षणा’ मालिकेचा हा रिमेक असल्याचं म्हटलं जात आहे. दोन अनोळखी मुलींचं नशीब एका रात्रीत बदललं, कोणी आणि का? ही नवी गोष्ट ‘अबीर गुलाल’ मालिकेत पाहायला मिळणार आहे. या नव्या मालिकेची घोषणा झाली असली तरी अद्याप प्रदर्शनाची तारीख गुलदस्त्यात आहे. पण या नव्या मालिकेतून ‘भाग्य दिले तू मला’मधील अभिनेत्री पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

हेही वाचा – ‘जुनं फर्निचर’ चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या लूकमध्ये झळकले ‘हे’ प्रसिद्ध अभिनेते, पाहा फोटो

‘भाग्य दिले तू मला’ मालिकेत सुवर्णा दाभोळकरच्या भूमिकेत पाहायला मिळालेली अभिनेत्री सुरभी भावेची ‘अबीर गुलाल’ मालिकेत वर्णी लागली आहे. यासंदर्भात तिनं स्वतः सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ‘अबीर गुलाल’ नव्या मालिकेचा प्रोमो इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर करत तिनं लिहिलं आहे, “लवकरच एका नव्या भूमिकेत.”

हेही वाचा – Video: सागर सावनी-कार्तिकचा डाव उधळून लावणार, मुक्ताला पुराव्यानिशी सर्वांसमोर निर्दोष सिद्ध करणार

दरम्यान, सुरभीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिनं बऱ्याच मालिका आणि चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. सध्या ती ‘राणी मी होणार’ या मालिकेत पाहायला मिळत आहे. याआधी सुरभी महेश मांजरेकरांच्या ‘ही अनोखी गाठ’ चित्रपटात झळकली होती.