Bhagya Lakshmi Actress Maera Mishra Baby Girl: ‘भाग्यलक्ष्मी’ या अत्यंत लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री मायरा मिश्रा हिच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. मायराने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून लग्नानंतर अवघ्या दीड वर्षांनी ती आई झाली आहे.

मायराने एक फोटो शेअर केला आहे, त्यात या दाम्पत्याने आपल्या हातात मुलीचे पाय धरलेले दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, “आम्ही जपून ठेवलेलं स्वप्न आज आमच्या हातात आहे. आमचा आनंदाचा प्रवास आता खऱ्या अर्थाने सुरू झालाय. आमच्या घरी चिमुकल्या परीचं आगमन झालं आहे.”

पाहा मायरा मिश्राची पोस्ट

मायरा मिश्राच्या या पोस्टवर चाहते आणि जवळचे मित्र-मैत्रिणी कमेंट्स करून अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. अमन गांधी, करिश्मा शर्मा, निती टेलर, अंजूम फकीह, कविता बॅनर्जी, खुशबू पाटनी, अदिती शेट्टी यांनी या जोडप्याचं अभिनंदन केलंय.

दरम्यान, गरोदरपणाच्या काळात मायरा सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. या दरम्यान तिने अनेक मजेशीर रील्स शेअर करत होती. काही महिन्यांपूर्वीच तिने मॅटर्निटी फोटोशूट शेअर करत गरोदरपणाची माहिती दिली होती. मायरा मिश्राने २०२४ मध्ये राजुल यादवशी साखरपुडा केला होता आणि फेब्रुवारी २०२५ मध्ये दिल्लीत लग्न केलं होतं. लग्नानंतर अवघ्या दीड वर्षात अभिनेत्री आई झाली आहे.

मायरा मिश्राने वैयक्तिक आयुष्यासाठी सोडली मालिका

अभिनेत्री मायरा मिश्राचे पती राजुल यादव स्किन स्पेशालिस्ट आहेत. लग्न करण्यासाठी मायराने ‘भाग्यलक्ष्मी’ मालिकेतून ब्रेक घेतला होता. साडेतीन वर्षे तिने या मालिकेत काम केलं आणि त्यानंतर लग्न व वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ब्रेक घेतला. मात्र, ती अभिनयात कधी पुनरागमन करणार, याबद्दल तिने काहीही सांगितलं नाही.