bhagyashree Shared A Post : इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत, जे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी यामार्फत शेअर करत असतात. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री भाग्यश्री न्हालवे.

भाग्यश्री न्हालवे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या कामासंदर्भातील अपडेट तसेच दैनंदिन जीवनातील घडामोडींबद्दलची माहितीसुद्धा यामार्फत देत असते. अशातच तिनं नुकतंच पतीबरोबर महाकालचं दर्शन घेतलं आहे. यावेळी तिनं सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. त्यामधून तिनं तिच्या आईबद्दलही लिहिलं आहे.

भाग्यश्री काही महिन्यांपूर्वी लग्नबंधनात अडकली; पण लग्नानंतर तिच्या आईचं निधन झालं. तिच्या आईच्या इच्छेनुसार तिनं लग्न केलं होतं. मात्र, आईचं निधन झाल्यानंतर तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्यावेळी अभिनेत्रीनं पोस्ट शेअर करून ही माहिती दिली होती. अशातच आता पुन्हा एकदा आईच्या आठवणीत तिनं पोस्ट शेअर करीत त्याला मोठी कॅप्शन दिली आहे.

Award Banner

भाग्यश्रीनं शेअर केली भावुक पोस्ट

या पोस्टमधून ती म्हणाली, “आई सांगून गेली राणा मागे वळून बघू नकोस… पण आई गेल्यापासून फक्त मागचंच आठवत होतं. सगळं काही विसरणं इतकं सोप नाही. पण, तरीही आईसाठी तिनं निवडून दिलेल्या मुलासोबत संसार करणं मी माझं कर्तव्य समजते. आई, मी खूप गोष्टी समजून गेलेय. खूप लोकांना नकोय माझं पुन्हा उभं राहणं. पण, तुझ्यासाठी आई तुला दिलेल्या शब्दाखातिर मी माझ्या आयुष्याची महादेवांच्या आशीर्वादाने आणि तुझ्या नारायणासोबत नवीन सुरुवात करीत आहे. माझं सुरेख सासर आणि माझा नवरोबा तुम्ही माझी ताकद बनलात. माझी आई गेल्यापासून जसं की माझं सगळ गेलं. फक्त पैशांसाठी सगळे कसा घात करतात याचा अनुभव मी घेतला. माझ्या आईनं सगळ्यांचे अनुभव घेतलेच होते. म्हणूनच तिनं मला लग्नासाठी भाग पाडलं.”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “माझी सोय केली; पण म्हणतात देव तारी त्याला कोण मारी… याची मला या कठीण काळात प्रचिती आली. जो सुख नहीं पूरे संसार मे, वहीं सुख हे महाकाल के दरबार में… देवा तू माझे डोळे उघडले यासाठी तुझे खूप आभार. असेच मला कायम महादेवा तुम्ही मार्गदर्शन द्या. सगळं सहन करण्याची खूप शक्ती आणि बुद्धी द्या. माझ्या यजमानांसोबत तू कायम आमच्याकडून तुझी सेवा करून घे. आणि ज्यानं मला जे जे दिलं, ते ते त्याला मिळू देत. ज्यांनी माझं सगळ लुबाडलं, त्यांना एकच सांगेन माझी आई वरून बघत आहे”.