Bharati Achrekar on Nana Patekar and Neena Kulkarni: भारती आचरेकर काही दिवसांपूर्वी ‘तिघी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. या सिनेमात त्यांच्याबरोबर नेहा पेंडसे व सोनाली कुलकर्णी यांनीही प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. दोन मुलींची आजारी आई, शेवटचा काळ, मुलींसाठी घेतलेले कठीण निर्णय आणि खंबीरपणा यातून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

या सिनेमानंतर सध्या त्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘मी जिंकून घेईन सारं’ मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या मालिकेत त्यांनी बाईआजी ही भूमिका साकारली आहे. बाईआजी आणि छवी यांच्यातील नाते, त्यांचे बॉण्डिंग लक्ष वेधून घेत आहे. त्यांच्यावर प्रेक्षक कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

आता मात्र भारती आचरेकर त्यांच्या भूमिकेमुळे नाही, तर त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. भारती आचरेकर यांनी अमोल परचुरेंना दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांच्याबद्दल वक्तव्य केले आहे. तसेच, नीना कुलकर्णी यांच्याबरोबरच्या मैत्रीबद्दलही वक्तव्य केले. अमोल परचुरेंच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. भारती आचरेकर, नीना कुलकर्णी व नाना पाटेकर यांची मैत्री जुनी आहे. त्या मैत्रीबद्दल नेमकं काय म्हणाल्या, हे जाणून घेऊ…

“जवळजवळ दर दोन महिन्यांनी आम्ही…”

भारती आचरेकर म्हणाल्या, “नाना, नीना आणि मी ही आमची मैत्री अजूनही घट्ट आहे. बाईंबरोबरही( विजया मेहता) आमचं नातं चांगलं आहे. जवळजवळ दर दोन महिन्यांनी आम्ही बाईंना भेटतो. अशी मैत्री, अशी माणसं आता मिळत नाहीत. आम्ही खूप छान आयुष्य उपभोगलेलं आहे, असं मला वाटतं. मला वाटत नाही की, हल्लीच्या पिढीमध्ये अशी आणि इतकी जुनी मैत्री टिकून आहे. ४०-५० वर्षे मैत्री टिकून आहे, असं होत नाही. त्या मैत्रीतून काहीतरी प्रत्येक वेळेला पाहिजे असतं.आमची खूप छान, शुद्ध मैत्री राहिलेली आहे”, असे म्हणत भारती आचरेकर यांनी नाना पाटेकर व नीना कुलकर्णी यांच्याबरोबरच्या मैत्रीबद्दल वक्तव्य केले.

मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री विजया मेहता यांच्याकडून अनेक कलाकारांनी नाटकाचे धडे घेतले आहेत. त्यामध्ये नाना पाटेकर व भारती आचरेकर यांचीही नावे आहेत. विजया मेहता त्यांच्या गुरू आहेत. आजही नाना पाटेकर व भारती आचरेकर यांचे गुरू विजया मेहता यांच्याबरोबरचे ऋणानुबंध तसेच आहेत. विजया मेहता यांच्या ९१ व्या वाढदिवसाला भारती आचरेकर व नानांनी त्यांच्या घरी जात खास पद्धतीने त्यांचा वाढदिवस साजरा केला होता. भारती आचरेकरांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. तसेच, नानांनी दादर मार्केटमधून खोली भरेल एवढी असंख्य प्रकारची फुलं आणली होती, असेही सांगितले होते. तसेच, गुरू विजया मेहता आणि नाना पाटेकर यांच्याबरोबरचा फोटोही शेअर केला होता.

नाना पाटेकर, नीना कुलकर्णी व भारती आचरेकर ही सिनेसृष्टीतील लोकप्रिय नावे आहेत. या तीनही कलाकारांनी विविध भूमिका साकारत त्यांची वेगळी ओळख निर्माण केली आहे. फक्त मराठीच नाही, तर हिंदीमध्येदेखील त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली. आजही चित्रपट, मालिका आणि नाटक या माध्यमांतून हे कलाकार प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करीत असल्याचे दिसतात.