Bhargavi Chirmule Comeback On Television: स्टार प्रवाहवरील ‘मराठी मिडियम’ मालिकेबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे. या सगळ्यात अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

भार्गवी चिरमुले मराठी मिडियम या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत भार्गवी नकारात्मक व्यक्तिरेखा साकारणार असून, विशाखा शुक्रे असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. आपल्या मतांवर ठाम असलेली विशाखा आपल्या आजूबाजूच्या जगाकडे वेगळ्याच नजरेनं पाहते. विशाखा एका मोठ्या बिझनेस फॅमिलीमध्ये वाढली आहे. तिच्या नवऱ्याचा स्वभाव चांगला असला तरी कर्तृत्वाच्या बाबतीत तो कमी पडतो, याची तिला जाणीव आहे. त्यामुळे मुलानं त्याच्या वडिलांसारखं होऊ नये, यासाठी तिनं पुरेपूर प्रयत्न केले आहेत.

भार्गवी चिरमुलेचं ६ वर्षांनंतर टेलिव्हिजनवर कमबॅक

विशाखाला प्रत्येक गोष्ट परफेक्ट हवी असते. ब्रँडेड नसलेल्या गोष्टींबद्दल तिला चीड आहे. अस्वच्छपणा तिला अजिबात सहन होत नाही. टेबल मॅनर्स आणि एटिकेट्स याबद्दल ती सहजपणे रकाने लिहू शकते. जे जे परदेशी, ते ते चांगलं, यावर तिचा विश्वास आहे. त्यामुळे जुन्या चालीरीती आणि परंपरांना तिच्या लेखी फारसं महत्त्व नाही.

या भूमिकेबद्दल भार्गवी चिरमुले म्हणाली, “स्टार प्रवाहसोबत सहा वर्षांनंतर पुन्हा जोडलं जाणं माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. सहा वर्षांपूर्वी सतीशसरांच्या ‘मोलकरीणबाई’ या प्रोजेक्टमध्ये मी होते. ती मालिका उत्तम पद्धतीनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. त्यानंतर टेलिव्हिजनवर काम करण्याचे योग काही जुळून आले नाहीत. वेगळं काम करत होते आणि त्यामुळे टेलिव्हिजनवर काम करणं जमलं नाही; पण आता सहा वर्षांनी जमलं आहे.”

अभिनेत्री असेही म्हणाली, “स्टार प्रवाह वाहिनी सातत्यानं वेगवेगळे विषय मालिकांच्या माध्यमातून हाताळत असते. ‘मराठी मीडियम’ची कथा आणि विशाखा शुक्रे हे पात्र माझ्यासाठी खूप वेगळं आहे. आतापर्यंत मी निगेटिव्ह भूमिका साकारलेल्या नाहीत. त्यामुळे हे पात्र साकारताना कस लागतोय. विशाखाची स्वतःची एक विचारसरणी आहे. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा तिचा वेगळा दृष्टिकोन आहे. या व्यक्तिरेखेतून माझा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळेल.”