Bharti Singh and Haarsh Limbachiyaa: भारती सिंग लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनेत्रीने विनोदी भूमिकांतून प्रेक्षकांची मने जिंकली. अभिनेत्रीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. भारती व तिचा पती हर्ष यूट्यूब व्हिडीओ आणि पॉडकास्टमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येतात.

भारती सिंगने २०१७ मध्ये हर्ष लिंबाचियाबरोबर लग्नगाठ बांधली. आता ते दोन मुलांचे पालक आहेत. सध्या ते एका वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. नुकतीच त्यांच्या पॉडकास्टमध्ये अभिनेत्री नेहा धुपिया व अंगद बेदी यांनी हजेरी लावली होती. त्यांच्याशी बोलताना भारतीने खुलासा केला की, हर्षने त्याच इमारतीत भाड्याने एक घर घेतले आहे. तसेच, त्याने तसे का केले आहे याचे कारणही सांगितले. भारती व हर्ष नेमकं काय म्हणाले हे जाणून घेऊ…

भारती म्हणाली, “काल त्याने मला सांगितले की मी तासभर झोपत आहे, मला कोणी उठवणार नाही, झोप मोड करणार नाही याची काळजी घे. घरातील स्त्रिया, आई असे कधी म्हणतात का?”

“मी त्याच इमारतीत एक वेगळे घर…”

पुढे हर्षने वेगळे घर असल्याबद्दल अभिमानाने सांगितले. तो म्हणाला, “मी काय केले आहे माहीत आहे का? मी त्याच इमारतीत एक वेगळे घर भाड्याने घेतले आहे. तिथे मी सकाळी जातो. घरातील गोंधळापासून दूर राहण्यासाठी आणि कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. मी तिथे अजून बेडही ठेवला नाही.”

हर्षच्या बोलण्यावर अंगद बेदी म्हणाला, “ही उत्तम गोष्ट केली आहे.” त्यावर नेहा म्हणाली, “पण, घरात बसून काम करायला काय अडचण आहे? तू त्या फ्लॅटमध्ये निवांतपणे काम करू शकतो, आराम करू शकतोस, कारण तुझ्या घरातील स्त्री सगळ्या गोष्टींची काळजी घेते.” त्यावर हर्ष म्हणाला, “आम्हाला मानसिक शांतता हवी असते.” त्यावर भारती म्हणाली, “मानसिक शांतता म्हणजे? मी तुझ्यासाठी दोन मुलांना सांभाळत आहे, त्याचं काय?”

भारती पुढे म्हणाली, “तो खाली जातो आणि गोष्टी करायला सांगतो. माझं जेवण पाठवून दे. मला डिस्टर्ब करू नकोस, मी मीटिंगमध्ये आहे, अशी कामे तो मला सांगतो.”

दरम्यान, भारती व हर्ष यांना २०२२ मध्ये पहिला मुलगा झाला आणि २०२५ मध्ये त्यांना दुसरा मुलगा झाला. भारती तिच्या यूट्यूबच्या माध्यमातून अनेक गोष्टी शेअर करते. यामध्ये तिच्या घरात काम करणाऱ्या मदतनीसांची, तसेच तिच्या मुलांची झलकदेखील पाहायला मिळते. भारती व्लॉगमध्येसुद्धा तिच्या विनोदी शैलीने सर्वांना खळखळून हसवताना दिसते.