आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना त्यांचं टेन्शन विसरायला लावणारे सर्वांचे लाडके अभिनेते म्हणजे भाऊ कदम. गेल्या कित्येक वर्षांपासून ते प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करत आहेत. भाऊ कदम यांचा आता एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. अशा या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय विनोदवीराला त्याच्या लेकीनं पहिल्या पगारातून खास गिफ्ट दिलं आहे. याचा व्हिडीओ भाऊ कदम यांच्या लेकीनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अभिनेते भाऊ कदम यांची लेक मृण्मयी कदम डिजिटल क्रिएटर आहे. त्यामुळे ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अलीकडेच तिनं वडील भाऊ कदम यांना पहिल्या पगारातून गिफ्ट घेतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिनं लिहिलं आहे, “माझ्या खास व्यक्तीसाठी. मी तुमचे खूप आभारी आहे, तुम्ही मला कायम पाठिंबा देता. आज मी इथे आहे, ते फक्त तुमच्यामुळे आणि यासाठी मी अगदी मनापासून कृतज्ञ आहे. तुम्हाला माझा अभिमान वाटेल, अशी मला आशा आहे.”

पुढे मृण्मयीनं लिहिलं, “माझ्या पहिल्या पगारातून तुम्हाला गिफ्ट द्यावं, असं मला नेहमी वाटतं होतं. मी तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी थोडी बचत केली होती. आता तुम्हाला आयुष्यात जे पाहिजे ते विकत घ्यायला तुमची मुलगी सज्ज झाली आहे. तुम्हाला गिफ्ट्स देणं हे मी कधीच थांबवणार नाही. जरी तुम्ही मला फटकारलंत तरीही मी तुम्हाला गिफ्ट देईन. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे.”

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री झळकणार लोकप्रिय हिंदी मालिकेत, साकारणार प्रमुख भूमिका!

मृण्मयीनं शेअर केलेल्या व्हिडीओत ती त्या दिवसाचा अनुभव सांगत आहे. गिफ्ट घेतल्यानंतर आभार न मानता भाऊ कदम काय म्हणाले?, असं सर्व काही सांगत आहे. मृण्मयीच्या हा व्हिडीओवर २ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा – Video: मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकर ट्रोल; अभिनेत्याची पत्नी भडकली, नावाच्या अर्थासह सांगितली जात, म्हणाली…

दरम्यान, भाऊ कदमांच्या लेकीचं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे. ज्यावर ७० हजारपेक्षा अधिक सबस्क्रायबर्स आहेत. एवढंच नव्हे तर मृण्मयीचा छोटा व्यवसाय देखील आहे. ‘तरुंध्या’ असं तिच्या व्यवसायाचं नाव आहे; ज्याद्वारे ती ट्रेंडी हेअर बो (स्क्रंचीज)चा व्यवसाय करते.