Bhau Kadam : विनोदाचं अचूक टायमिंग साधत रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकप्रिय अभिनेते म्हणून भाऊ कदम यांना ओळखलं जातं. आजवर त्यांनी ‘फू बाई फू’ आणि ‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी शोच्या माध्यमातून चाहत्यांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. भाऊ कदम यांना ऑनस्क्रीन पाहण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. अनेकदा ते नाटक, सिनेमा अन् कॉमेडी शोमध्ये एकत्र काम करताना दिसतात. त्यांचं शेड्युल फार व्यग्र असतं…अशावेळी भाऊ त्यांचं शेड्युल कसं मॅनेज करतात याबद्दल त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

“भाऊ तुम्ही एवढ्या व्यग्र शेड्युलमध्ये थकत नाहीत का?” यावर अभिनेते सागर खापरेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा…तुम्हाला त्या कामाची आवड असणं महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला त्या कामाची आवड नसेल किंवा तुम्ही इच्छेविरोधात जर काम केलात…तर तुम्हाला आळस येणार…कंटाळा येणार! मी इतके वर्ष माझ्या आवडीचं काम करतोय….म्हणून मी आनंदी आहे.

“तेच-तेच काम करून अनेकदा कलाकारांना Saturation येतं. पण, माझ्या बाबतीत हे घडत नाही. कारण, आमचं काम हे वेगवेगळं असतं. एकच गाणं मी १० वेळा म्हणतोय किंवा तेच काम पुन्हा करतोय असं कधीच होत नाही. त्यामुळे मला कधीच कामाचा कंटाळा येत नाही. प्रेक्षक मनोरंजनासाठी विविध सिनेमे, नाटक या कलाकृती पाहतात…तर या सगळ्या प्रेक्षकांचं मनोरंजनच आम्ही करतो. त्यामुळे कंटाळा करून चालत नाही. नाटकाच्या दौऱ्यासाठी आम्हाला विविध ठिकाणी फिरावं लागतं, अशावेळी बाहेर जायचं असतं मग सगळेच उत्सुक असतात.”

“आता माझ्या शेड्युलबद्दल सांगायचं झालं तर, मी रंगभूमीवर सुद्धा काम करतो…त्यामुळे माझ्या शेड्युलमध्ये शनिवार-रविवार हे वार नाटकासाठी असतात. जर चित्रपटाचं शूटिंग सुरू असेल तर मी तारखा देऊन ठेवतो. यात नाटक आणि सिनेमाचं शूट क्लॅश होत असेल तर मी निर्मात्यांना तशी कल्पना देऊन ठेवतो. मग दोन्ही गोष्टी जुळवता येतात. म्हणजे सकाळ ते संध्याकाळी ७ पर्यंत सिनेमाचं शूट करून मग रात्री नाटकाच्या प्रयोगाला जायचं असं माझं एकंदर नियोजन असतं.” असं भाऊ कदम यांनी सांगितलं.

“स्टेजवर काम करताना खूप मेहनत घ्यावी लागते. आजारपण, दुखणं हे सगळं विसरावं लागतं आणि हे विसरून डोक्यात फक्त आपले जे संवाद आहेत…त्याचा विचार करून काम करावं लागतं.” असंही त्यांनी स्पष्ट केलं.