Bhau Kadam on upcoming series: भाऊ कदम यांनी ‘चला हवा येऊ द्या’, ‘फू बाई फू’ अशा कार्यक्रमांतून त्यांच्या भूमिकांद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. त्यांची डायलॉग म्हणण्याची पद्धत, विनोदाचे अचूक टायमिंग यांमुळे भाऊ कदम लोकप्रिय आहेत. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी अनेक सिनेमांत कामही केले आहे.

टीव्ही शो, सिनेमा, वेब सीरिज यांबरोबरच भाऊ कदम नाटकांतूनही प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्यांचे नवीन नाटक आले आहे. ‘पहिली लग्नाची, दुसरी प्रेमाची’, असे या नाटकाचे नाव आहे. आता या नाटकाच्या निमित्ताने भाऊ कदम यांनी ‘तारांगण’शी संवाद साधला. त्या मुलाखतीत त्यांनी नवीन नाटकाबद्दल आणि नवीन पिढीबरोबर काम करण्याबद्दल, तसेच लेखक स्वप्नील बारसकर आणि ज्यांनी हे नाटक बसवलं, त्या संतोष पवार यांच्याबरोबर काम करण्याबद्दल वक्तव्य केले.

“त्यांना टेन्शन येतं की…”

याबरोबरच, शूटिंग नसताना भाऊ कदम काय करतात, घरी कसा वेळ घालवतात, याबद्दलही त्यांनी सांगितले. भाऊ कदम म्हणाले, “वेब सीरिज, नाटक, सिनेमात काम करीत असताना मधे वेळ असतो. त्यावेळी मी आराम करतो. मी कुठे जात नाही. शनिवार-रविवारी नाटक येतं. त्यामुळे मला इतर नाटकं बघायलाही मिळत नाहीत. आता दोन-दोन नाटकांचे प्रयोग सुरू झाल्यानंतर माझी धावपळ होणार. पण, काम करत राहणं मला ऊर्जा देतं. घरी बसलं, तर अनेक विचार येऊ शकतात. आपले खूप कलाकार आहेत. त्यांना टेन्शन येतं की, चार महिने किंवा एक-दोन वर्षं बिझी होतो. आता पुढे काय, असा त्यांना प्रश्न पडतो. पण, मधल्या वेळेत असं टेन्शन घेऊ नका. काम मिळणार. आता काही दिवसांनी मला काम मिळालं नाही, तर टेन्शन घेण्यात काही अर्थ नाही. आपण दुसरं काहीतरी करीत राहिलं पाहिजे.”

जेव्हा रिकामा वेळ मिळतो किंवा शूटिंग नसतं, तेव्हा तुम्ही काय करता? असे विचारल्यानंतर भाऊ कदम म्हणाले, “मी सिनेमे बघतो. फार कमी वेळा मी बाहेर जातो, मी घरीच जास्त असतो. घरी असलो की, बाकीची कामं करतो. मला जितका वेळ मिळेल तितका मी माझ्या क्षेत्राशी काय निगडित आहे, ते बघत असतो.”

पुढे ते कुटुंबाबद्दल म्हणाले, “मी बायकोबरोबर शॉपिंगला जातो; पण तिथे लोक ओळखतात, गर्दी करतात. कधी कधी पत्नी म्हणते की, तुम्ही येऊ नका, लोक असतात. मी त्यांच्याबरोबर पिकनिकला जातो. मी फॅमिली लाईफ जगतो”, असे म्हणत भाऊ कदम यांनी शूटिंग नसताना कुटुंबाबरोबर वेळ घालवत असल्याचे सांगितले.

दरम्यान, भाऊ कदम ‘चुंबक’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ही हिंदी वेब सीरिज १० सप्टेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांना ती नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.