Bhau Kadam LoveStory : विनोदाचं अचूक टायमिंग साधत रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकप्रिय अभिनेते म्हणून भाऊ कदम यांना ओळखलं जातं. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सुरुवातीच्या काळात संघर्ष करून भाऊंनी आज एवढं मोठं यश मिळवलं आहे. या प्रवासात भाऊ कदम यांना त्यांच्या पत्नीने खंबीर साथ दिली. अभिनेते व्हॅलेंटाईन्स डे, लग्नाच्या वाढदिवशी पत्नीबरोबरचे गोड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली लव्हस्टोरी पहिल्यांदाच सांगितली आहे.
भाऊ कदम यांनी सागर खापरे यांच्या पॉडकास्टमध्ये त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं आहे. भाऊ आणि ममता यांचं लव्हमॅरेज आहे. या दोघांची भेट ममता यांच्या घरी, त्यांच्या बहिणीमुळे झाली होती. चांगली ओळख झाल्यावर पुढे, काही महिन्यांनी ममता यांचा शांत, समंजस स्वभाव पाहून भाऊंनी त्यांना लग्नाची मागणी घातली होती. भाऊ कदम यांना ३ मुली आणि १ मुलगा आहे. एकमेकांच्या साथीने हा सुखी संसार सुरू असल्याचं भाऊ सांगतात.
भाऊ कदम सांगतात, “माझं लव्हमॅरेज आहे. जी माझी मेहुणी आहे…म्हणजेच माझ्या बायकोची बहीण ती आमच्या एकांकिकेत काम करायची. आमचा संपूर्ण ग्रुप एकदा त्यांच्या घरी गेला होता…मी सुद्धा त्यांच्याबरोबर गेलो होतो. हळुहळू जाणं-येणं वाढलं. ममताची ( पत्नी ) आणि माझी ओळख, भेट तिथेच झाली, ममता घरात यांची मोठी बहीण होती. ओळख झाल्यावर मध्ये अनेक महिने गेले…आमचं छान जुळलं. आम्ही एकमेकांना ओळखून घेतलं…असं अजिबात झालं नाही की, आता पाहिलं आणि दुसऱ्यादिवशी लगेच तिला विचारलं, मध्ये बरेच महिने गेले.”
“त्यानंतर मग एकेदिवशी मी मनातल्या भावना कबूल करायचं ठरवलं. ‘हो’ म्हटली तर चांगलंच आहे…असा विचार माझ्या मनात होता, आणि खरंच ती ‘हो’ म्हणाली. तिने माझं घर वगैरे काहीच पाहिलं नव्हतं. त्याआधीच तिने होकार दिला. मग, आमचं लग्न झालं.” असं भाऊ कदम यांनी सांगितलं.
दरम्यान, ‘फू बाई फू’, ‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी कार्यक्रमांमुळे भाऊ कदम यांना घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. अलीकडेच ते ‘प्रेमाची गोष्ट २’ या सिनेमात झळकले होते. याशिवाय भाऊ सध्या ‘सिरियल किलर’ या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. लवकरच भाऊ कदम आणि निलेश साबळे एका सिनेमात सुद्धा एकत्र झळकणार आहेत.
