Marathi Actress shares emotional post for Sakshi Mahajan and Atharva Karve: साक्षी महाजन आणि अथर्व कर्वे यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली. साक्षी आणि अर्थवच्या लग्नातील अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या फोटोंमधून त्यांच्या लग्नातील काही खास क्षण पाहायला मिळत आहेत. त्यांच्या लग्नाला अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यात अजिंक्य राऊत, ऐश्वर्या शेटे, सुकन्या मोने, भूमिजा पाटीलसह अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
त्यांनी सोशल मीडियावर अनेक फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. काही व्हिडीओंमध्ये हे कलाकार मजा करताना दिसले होते. जेव्हा साक्षी आणि अर्थवचे लग्न झाले तेव्हा सुकन्या मोने, भूमिजा भावूक झाल्याचेदेखील पाहायला मिळाले.
आता भूमिजाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये साक्षी आणि अथर्वच्या लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये साक्षी आणि अथर्व यांच्यासह भूमिजा दिसत आहे.
“तुम्हाला वैवाहिक आयुष्यासाठी…”
भूमिजाने हे फोटो शेअर करताना भावूक होत मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. तिने लिहिले, “अथर्व, आजपासून मी तुझा सवत म्हणून स्वीकार करते आणि तू माझी लाडकी सवत आहेस.”
पुढे तिने लिहिले, “विनोदाचा भाग सोडा, पण तुम्हाला वैवाहिक आयुष्यासाठी खूप शुभेच्छा; तुम्ही हे करून दाखवलं. अखेर खरं प्रेम हे शेवटपर्यंत टिकतंच. खऱ्या अर्थाने तुम्ही एकमेकांसाठी बनलेले आहात.”
भूमिजाने अर्थवला उद्देशून असे लिहिले, “प्लीज, माझ्या मैत्रिणीची काळजी घे. लग्न झालंय तरीही तिच्यात एक लहान मूल आहे, ते कायम जिवंत ठेव. माझं तुमच्या दोघांवर प्रेम आहे”, असे लिहित भूमिजाने साक्षी आणि अर्थवला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. या पोस्टसह अभिनेत्रीने शेअर केलेले फोटोदेखील लक्ष वेधून घेत आहेत.
भूमिजाने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “हे फोटो, गाणे, कॅप्शन खूप छान आहे”, दुसऱ्या एकाने “खूप क्यूट” असे लिहित कौतुक केले आहे; तर काहींनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.
भूमिजा आणि साक्षीने ‘माझी माणसं’ या मालिकेत एकत्र काम केले होते. सध्या भूमिजा ‘शुभ श्रावणी’ या मालिकेत काम करत असल्याचे दिसत आहे.
या आधी भूमिजा ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मालिकेतील तिची सरू ही भूमिका चांगलीच गाजली होती. आता ‘शुभ श्रावणी’ मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

